रस्ता भरकटलेल्या त्या सैनिकाला तात्काळ सोडा; चीनची भारतीय लष्कराकडे मागणी
देश बातमी

रस्ता भरकटलेल्या त्या सैनिकाला तात्काळ सोडा; चीनची भारतीय लष्कराकडे मागणी

लडाख : भारतीय सैनिकांनी पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल भागात फिरणाऱ्या एका सैनिकाला ताब्यात घेतले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या सैनिकाला तात्काळ सोडावे, अशी मागणी आता चीनकडून करण्यात आली आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात फिरणाऱ्या या चिनी सैनिकाला भारतीय लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चीनचा हा सैनिक अंधार असल्यामुळे रस्ता चुकला. कठीण भौगिलिक परिस्थितीमुळे तो सैनिक भारत-चीन सीमेवर बेपत्ता झाला होता. अशी माहिती चीनी लष्कराने एका वेबसाईटच्या माध्यमांतून भारतीय लष्कराला दिली आहे. त्यानंतर दोन तासांनंतर भारतीय लष्कराने देखील चीनचा बेपत्ता झालेला सैनिक सापडल्याचे कळविण्यात आले होते. त्यानंतर आता सक्षम प्राधिकरणाकडून निर्देशानुसार, त्या सैनिकाला पुन्हा चीनकडे सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात ८ जानेवारी रोजी देखील लडाखच्या भारतीय हद्दीत अशाच एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराने पकडले होते. पण काही दिवसातच प्रक्रियेनुसार, त्याला परत चीनकडे सोपवण्यात आले. तथापि, पूर्व लडाखमध्ये मागच्यावर्षीपासून भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती अद्यापही कायम आहे. दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले असेऊन फायटर विमानांसह अत्याधुनिक शस्त्रास्त्र दोन्ही बाजूंनी तैनात केली आहेत.

तर दुसरीकडे, दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्याही झाल्या आहेत. मात्र अद्याप दोन्ही देशांमधला सीमावादाचा तिढा सुटलेला नाही. चीनच्या आक्रमकतेमुळे हा वाद अधिकच चिघळत चालला आहे. मात्र भारतीय लष्कराने प्रत्येक आघाडीवर चिनी सैन्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

त्याचबरोबर, जून महिन्यात पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यानंतर पँगाँग सरोवराच्या परिसरात गोळीबाराच्या घटनाही घडल्या आहेत. चीन पँगाँग सरोवराच्या फिंगर फोर भागातून माघार घेत नाहीय. याच भागातील महत्त्वाच्या टेकडया भारतीय सैन्याने आपल्या ताब्यात घेऊन चीनवर रणनितीक दृष्टीने वर्चस्व मिळवले आहे.

यापूर्वी १९ ऑक्टोबर २०२० रोजी लडाखमधील डेमचोक सेक्टरमध्ये एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, निर्धारित नियमावलीचे पालन करून त्याला पुन्हा चीनकडे सुपूर्द करण्यात आले होते. सन २०२० च्या पूर्वार्धापासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला भारत आणि चीनचे सैन्य तैनात करण्यात आले आहे. सध्या दोन्ही देशांच्या लष्करामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, त्यावर समाधानकारक तोडगा अद्याप निघालेला नाही. कडाक्याच्या थंडीमुळे चिनी सैन्याच्या हालचाली मंदावल्या असल्या तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वातावरण मात्र तापलेलेच आहे.