सरकार पडण्याकडे अनेकजण डोळे लावून बसले होते; पण आपल्या आशीर्वादाने सरकारने वर्ष पूर्ण केलं
बातमी महाराष्ट्र

सरकार पडण्याकडे अनेकजण डोळे लावून बसले होते; पण आपल्या आशीर्वादाने सरकारने वर्ष पूर्ण केलं

मुंबई : “आणखी एका गोष्टीचा उल्लेख मला करायचा आहे. अनेक जण डोळे लावून बसले होते. आता पडेल… मग पडेल… उद्या पडेल… आता पडलंच… हे चालणारच नाही. असं करता करता आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या विश्वासाने सरकारने वर्ष पूर्ण केलं. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. तसेच, गेल्या २८ नोव्हेंबरला आपल्या आशीर्वादाने सरकारने… महाविकास आघाडीच्या सरकारनं एक वर्ष पूर्ण केलं आहे. पण, वर्षपूर्तीबरोबरच जगात शंभर वर्षापूर्वी आलेल्या परिस्थितीसारख्याच स्थितीचा सामना करत आणि राजकीय हल्ले परतवत विकास कामं केली,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ”आता रहदारी वाढल्यानंतर थंडीतील आजार दिसू लागले आहेत. मार्चपासून राज्यात करोनाचे रुग्ण दिसायला लागले. त्याची वाढ कशी झाली. याची आठवण करून देण्याचं कारण आता हिवाळा आलेला आहे. पावसाळा व उन्हाळ्यात साथी पसरल्या नाहीत. पण, रहदारी सुरू झाली आहे. येणं जाणं सुरू झालं आहे. पण कुटुंबप्रमुख म्हणून सावध रहा सांगत राहणं हे माझं कर्तव्य आहे. यावर एकच उपाय आहे. मास्क लावणं, हात धुत राहणं आणि डिस्टन्स पाळणं,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

ते पुढे म्हणाले की, आपल्या देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काल सांगितलं की, करोनावरील लस आली तरी मास्क तुम्हाला लावावा लागणार आहे. म्हणजेच लस आतापर्यंत आलेली नाही परंतु लस येईल तेव्हा येईल, आल्यानंतर आपल्या पर्यंत पोहचेल तेव्हा पोहचेल. परंतु ते घेतलं तरी मास्क लावणं हे बंधनकारक माझ्या मते किमान पुढील सहा महिने तरी आहेच.”

तसेच, लॉकडाउनच्या काळानंतर आता गर्दी वाढू लागल्याने थंडीचे आजार काही प्रमाणात दिसू लागले आहेत. या सर्वांवर औषधं जरी असली तरी प्रतिबंधात्मक इलाज जो कोविडसाठी आहे तोच आहे. मास्क लावा, हात धुवा व सुरक्षित अंतर ठेवा. हे जर आपण कटाक्षाने पाळलं, तर कोविडचं काय इतर कोणतेही साथीचे आजार, आपण जर त्यांच्यापासून अंतर ठेवलं तर तेही आपल्यापासून अंतर ठेवतील.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.