अनिल देशमुखांना झटका; सचिन वाझे ‘ईडी’चा माफीचा साक्षीदार होणार
बातमी मुंबई

अनिल देशमुखांना झटका; सचिन वाझे ‘ईडी’चा माफीचा साक्षीदार होणार

मुंबई: १०० कोटी रुपयांच्या वसूली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशातच आता बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. सचिन वाझे (Sachin Waze) याने ईडीला यासंदर्भात पत्र पाठवले आहे. आता १४ फेब्रुवारीला ईडी या पत्रासंदर्भात न्यायालयात आपलं म्हणणं मांडणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या संदर्भातील मला ज्ञात असलेली संपूर्ण वस्तुस्थिती सक्षम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास तयार आहे. ‘सीआरपीसी’च्या कलम ३०६, ३०७ नुसार मला माफी देण्यासाठी या अर्जावर निर्णय घेण्याची मी तुम्हाला विनंती करतो, असे सचिन वाझेने पत्रात म्हटले आहे. काही दिवासंपूर्वीच सचिन वाझे याने अनिल देशमुख यांना अडचणीत आणणार जबाब ईडीला दिला होता. अनिल देशमुख यांनीच मला पोलीस दलात पुन्हा येण्याविषयी सुचवले. राज्य सरकारमधील अनेक वरिष्ठ नेते यासाठी तयार नव्हते. मात्र, मी त्यांना समजवेन, असे अनिल देशमुख यांनी मला सांगितले होते. तसेच पोलीस दलात पुन्हा येण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणीही अनिल देशमुख यांनी केली होती. परंतु, मला इतके पैसे देणे शक्य नसल्याचे मी अनिल देशमुख यांना कळवले होते. तरीही अनिल देशमुख यांनी मला परमबीर सिंह यांच्याकडे पोलीस दलात पुन्हा रुजू होण्यासाठीचा विनंती अर्ज देण्यास सांगितले. त्यानंतर मी अनिल देशमुख यांच्या मर्जीप्रमाणे पोलीस दलात पुन्हा रुजू झालो, असे सचिन वाझेने ‘ईडी’ला सांगितले होते.

मी पोलीस दलात रुजू झाल्यानंतर माझ्याकडे गुप्तवार्ता विभाग( CIU) आणि अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. अनिल देशमुख यांनी मला बार आणि रेस्टॉरंटसकडून वसुली करण्यास सांगितले. त्यानंतर मी डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०१२१ या काळात अनिल देशमुख यांना ४ कोटी ७० लाख रुपये दिले. हे सर्व पैसे अनिल देशमुख यांचा स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे याच्या माध्यमातून पोहोचवण्यात आल्याचेही सचिन वाझेने म्हटले होते.

मी निलंबित असतानाही काम करत होतो: सचिन वाझे

सचिन वाझे याची बुधवारी चांदिवाल आयोगाकडून चौकशी करण्यात आली. त्यावेळीही सचिन वाझे याने अनेक खळबळजनक गोष्टींचा खुलासा केला होता. करोना काळात पोलिसांनी वांद्रे येथे एन-९५ मास्कचा साठा जप्त केला होता. त्यामध्ये माझी महत्त्वाची भूमिका होती. मी निलंबित असतानाही काम करत होतो, असे वाझे याने सांगितले. अनिल देशमुख मी निलंबित असतानाही माझ्या कामगिरीवर खूश होते. त्यामुळेच अनिल देशमुख यांनी माझे निलंबन रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. आर्थिक गैरव्यहार उघडकीस आल्यानंतर अनिल देशमुख यांनी माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी दिली होती, असेही सचिन वाझे याने चौकशीदरम्यान सांगितल्याचे समजते.