तिरुपती मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अजब घटना; देवस्थानविरोधात भाविक थेट…
देश बातमी

तिरुपती मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अजब घटना; देवस्थानविरोधात भाविक थेट…

तिरुपती : एका भाविकाला विशेष पूजेसाठी १४ वर्ष वाट पाहायला लावणं तिरुमला तिरुपती देवस्थानला चांगलंच महागात पडलं आहे. सदर भाविकाने ग्राहक न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने देवस्थानला ५० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारदाराला वस्त्रलंकार सेवेसाठी वर्षभरात नवी तारीख मिळावी किंवा ५० लाख रुपयांची भरपाई द्यावी, असं ग्राहक न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तिरुमला तिरुपती देवस्थानविरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. केआर हरी भास्कर असं तक्रारदार भाविकाचं नाव आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

भास्कर यांनी २००६ साली १२ हजार २५० इतकी रक्कम भरून बुकिंग केले होते. ही रक्कम आता व्याजासह परत देण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. करोना साथरोगाच्या काळात मार्च २०२० पासून तिरुमला तिरुपती मंदिर ८० दिवस दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे मंदिरात होणाऱ्या वस्त्रलंकारासह इतर सेवाही थांबवण्यात आल्या होत्या. तेव्हा तुम्हाला व्हीआयपी दर्शनासाठी नवीन तारीख हवी की पैसे परत हवेत, अशी विचारणा मंदिर देवस्थानने केआर हरी भास्कर यांच्याकडे केली होती. मात्र भास्कर यांनी वस्त्रलंकार सेवेसाठी नवीन तारीख मिळावी, अशी मागणी केली होती.

देवस्थानने मंदिर सेवा दुसऱ्या तारखेला घेण्यास दिला नकार

तिरुमला तिरुपती देवस्थानने वस्त्रलंकार सेवा रीशेड्युल करणं शक्य नसल्याचं कळवलं होतं. तसंच तुम्ही रिफंड घ्यावा, असं भाविकाला कळवलं होतं. मात्र त्यानंतर भास्कर यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली आणि देवस्थान समितीविरोधात तक्रार दिली. त्यानंतर न्यायालयाने देवस्थानला पुढील वर्षभरात भाविकाला वस्त्रलंकार सेवेसाठी नवीन तारीख द्यावी किंवा भरपाई म्हणून ५० लाख रुपये द्यावेत, असे आदेश दिले आहेत.