कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमरावतीत कडक निर्बंध
बातमी विदर्भ

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमरावतीत कडक निर्बंध

अमरावती : अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये करोना विषाणुचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसून येत आहे. अशा परीस्थितीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबत विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पियुष सिंह यांनी दिलेल्या सूचनांनुसार, अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागांमधील प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून सदर भागाच्या सीमा निश्चित करून या क्षेत्रांमध्ये विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या सूचनांमध्ये प्रामुख्याने दुकानांच्या वेळा सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार असून, विवाह समारंभाकरिता २५ व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. सदरचे निर्बंध हे १ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत राहणार आहेत.

तसेच, अमरावती विभागातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित शहरी आणि ग्रामीण भागासाठी सुधारित निर्देश देण्यात आलेले आहेत. यात सर्व प्रकारची दुकाने आणि आस्थापना ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.

सर्व प्रकारची शासकीय कार्यालये ही १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येतील. तसेच सर्व प्रकारच्या खासगी कार्यालयातील आस्थापना या एकूण १५ टक्के किंवा कमीत कमी १५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येतील. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका क्षेत्रातील जे उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी यापूर्वीच देण्यात आलेली आहे, ते उद्योग नियमितपणे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ग्राहकांनी खरेदीसाठी जवळ असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांच्याकडे खरेदी करावी. शक्यतो दूरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे. सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील. लग्न समारंभाकरिता वधू व वर पक्षासह पंचवीस व्यक्तींना परवानगी राहील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालय येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे इत्यादी कामांकरिता परवानगी राहील.

संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे, संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील.

आठवडाअखेर असलेल्या संचारबंदीच्या वेळी दूध विक्रेते यांची दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत आठवड्याचे संपूर्ण सात दिवस नियमितपणे सुरू राहतील. सद्यस्थितीमध्ये मिशन बिगीन अगेन अंतर्गत जी सूट देण्यात आलेली होती, ती रद्द करून सदरचे निर्बंध १ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत लागू करण्यात येत असुन, याबाबतचे निर्देश विभागीय आयुक्त यांनी एका पत्राद्वारे दिले आहेत. येत्या काळात सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहतील. आठवडाअखेर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी दुकाने बंद राहतील.