काँग्रेसला मोठा झटका! माजी प्रदेशाध्यक्षांचा भाजपात प्रवेश
राजकारण

काँग्रेसला मोठा झटका! माजी प्रदेशाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसचे मणिपूर प्रदेशाध्यक्ष असलेले गोविंददास कोंथऊजम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या दिल्लीमधील पक्षकार्यालयात गोविंददास यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोविंददास यांचा पक्षप्रवेश झाला. यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल बलुनी यांनी रविवारी सकाळीच भाजपमध्ये एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होणार असल्याचं ट्वीट केलं होतं. त्यानुसार दुपारा १२ वाजता गोविंददास यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. यावेळी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह हे देखील उपस्थित होते. पुढील वर्षी मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मी या निवडणुकांमध्ये भाजपासाठी पूर्ण क्षमतेनं काम करेन, अशी प्रतिक्रिया गोविंददास यांनी पक्षप्रवेशानंतर दिली.

गोविंददास हे मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बराच काळ कार्यरत होते. मात्र, वैयक्तिक कारणं पुढे करून त्यांनी पाचच दिवसांपूर्वी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. याशिवाय, त्यांनी मणिपूर विधानसभा आमदारकीचा देखील राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्यामागे वैयक्तिक नसून अंतर्गत राजकीय कारणे असावीत, अशी चर्चा सुरू झाली आहे. गोविंददास हे पूर्वेकडील राज्यांमधले आणि विशेषत: मणिपूरमधले महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या विष्णुपूर मतदारसंघातून ते ६ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.