मुंबईचे पर्यटक थोडक्यात बचावले; काळू धबधब्यावर खडकावरुन पाय घसरला तेवढ्यात…
पुणे बातमी

मुंबईचे पर्यटक थोडक्यात बचावले; काळू धबधब्यावर खडकावरुन पाय घसरला तेवढ्यात…

पुणे: पावसाळा सुरू असल्याने निसर्ग आपल्याला पर्यटनासाठी खुणावतो आहे. मुंबई, पुण्यातून अनेक पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडतात. मात्र, अनेकदा अशा घटना घडतात की, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. असाच एक प्रकार जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर परिसरातील काळू धबधबा येथे घडला. या ठिकाणी फिरायला आलेले दोन पर्यटक पाण्यात वाहून जात होते. सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले आहे. शिवनेरी ट्रेकर्स या रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी त्या दोन पर्यटकांना वाचवले आहे. शिवनेरी ट्रेकर्सच्या सदस्यांनी त्यांना बाहेर काढले. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशी त्यांची स्थिती झाली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शनिवार, रविवार सलग सुट्टी असल्याने मुंबईहून काही पर्यटक पर्यटनासाठी जुन्नर तालुक्यातील काळू धबधबा येथे आले होते. मात्र, यामध्ये चार तरुणी आणि एक तरुण धोकादायक ठिकाणी पर्यटनसाठी पाण्यात उतरले होते. जल्लोष करत असताना अचानक त्यातील एक तरुण आणि तरुणीचा खडकावरून पाय घसरला.

ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागले. त्यांची अवस्था पाहून त्यांचे मित्र घाबरून गेले होते. ते काही अंतर वाहून चालले होते. त्या दोघांच्या मित्रांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर परिसरात काही पर्यटक पर्यटनासाठी आले होते. त्यात शिवनेरी ट्रेकर्सचे ट्रेकरही होते. त्या वाहून जाणाऱ्या तरुण आणि तरुणीला काही अंतरावर गेल्यावर त्यांनी सुखरूप बाहेर काढले.

त्यांचा जीव वाचल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र ही घटना पर्यटकांनी कोणतीही काळजी न घेतल्याने घडली.आज शिवनेरी ट्रेकर्सचे ट्रेकर्स नसते तर या तरुण आणि तरुणीला कदाचित आपला जीवही गमवावा लागला असता.

काळू धबधबा हा जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध धबधबा असून अनेक पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. रविवारी ५० हून अधिक पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते. यात या तरुण तरुणीचा देखील समावेश होता. पर्यटकांचा बेजबाबदारपणा या घटनेला कारणीभूत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.