पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार – नितीन गडकरी
पुणे बातमी

पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार – नितीन गडकरी

पुणे दि.12: पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुण्यात 50 हजार कोटींचे पूल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे उभारण्यात येतील आणि पुणे-बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुणे शहरात एनडीए चौकातील (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग क्र.48 वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प तसेच खेड व मंचर रस्ता चौपदरीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री.गडकरी म्हणाले,  येणाऱ्या काळात पुणे हे देशाच्या विकासाचे केंद्र होणार आहे, पुणे अनेकांना रोजगार देणार आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारं शहरही पुणेच आहे. चोवीस तास पाणी आणि उत्तम रस्ते पुण्यासाठी आवश्यक आहेत. भारत सरकारच्यावतीने निश्चितच पुण्याचा विकासासाठी सहकार्य करण्यात येईल. पुण्यातील प्रकल्पांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल.

पुणे-सातारा महामार्गावरील दुमजली डबलडेकर पूल, हडपसर-यवत उन्नत मार्ग, पुणे-शिरूर-अहमदनगर 56 किलोमीटरचा मार्ग, तळेगाव-शिक्रापूर-चाकण 54 किलोमीटरचा मार्ग आणि नाशिक फाटा ते खेड मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार आहे. पुणे विभागात पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प देण्यात आले असून त्यातील काही पूर्ण झाले आहेत. 12 हजार कोटींचे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग डिसेंबर अखेर पूर्ण होतील असे त्यांनी सांगितले.

 शहरातील प्रदूषण कमी करा

श्री.गडकरी म्हणाले, चांदणी चौक प्रकल्पासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.  मोठ्या प्रकल्पांवरील खर्च आणि वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. पुण्यात हवेतून चालणाऱ्या एअर बसेसबाबतही पर्याय म्हणून अभ्यास करावा. पुण्यातील ऑटो रिक्षांना नवे परवाने देताना इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर  चालणाऱ्या रिक्षांना परवाने दिल्यास प्रदूषण कमी होईल.

ग्रीन हायड्रोजन हे भविष्य असल्याने शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचा विचार व्हावा. पुण्यातील सर्व कचऱ्याचे विलगीकरण करून पुणे चक्राकार मार्गासाठी वापरल्यास कचऱ्याची समस्या दूर होईल. पुण्यातील अशुद्ध पाणी शुद्ध करून उद्योग, शेती आणि रेल्वेला दिल्यास जलप्रदूषण दूर होण्यास मदत होईल. शहरातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासोबत शहरातील प्रदूषण दूर करण्यावर अधिक भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्य शासनाने नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून सोलापूर, पुणे आणि नाशिक सारख्या शहरातील रस्ते प्रकल्पाच्या कामांसाठी भूसंपादन वेगाने झाले. चांदणी चौकातील प्रकल्पासाठीही या निर्णयाचा उपयोग झाला. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांनीही चांगले काम केल्याचे श्री.गडकरी म्हणाले.