राकेश टिकैत यांचे अश्रू ठरले टर्निंग पॉईंट; शेतकरी आंदोलनाचा पलटला नूर
देश बातमी

राकेश टिकैत यांचे अश्रू ठरले टर्निंग पॉईंट; शेतकरी आंदोलनाचा पलटला नूर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन थंड पडू लागले होते. मात्र कालपासून अचानक या आंदोलनात पुन्हा एकदा प्राण फुंकल्याचे चित्र दिसत आहे. काल सूर्यास्तानंतर इथे मोठ्या संख्येत पोलीस फौजफाटा तैनात होता, मात्र आता तो कमी होऊन आता आंदोलक शेतकऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. याचे कारण म्हणजे एका शेतकऱ्याचा व्हिडीओ. भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी गाजीपूर आंदोलनाचा सगळा नूरच पालटला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काल रात्री पोलिसांची तयारी पाहून हे आंदोलन सकाळी सूर्य उजाडेपर्यंत राहतं की नाही चर्चा सुरु झाली होती. पण राकेश टिकैत यांच्या भावनिक व्हिडीओची लाट पश्चिमी उत्तर प्रदेशात जोरात उसळली. प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर व्ही. एम. सिंह यांची संघटना आंदोलनातून बाहेर पडली. त्यामुळे गाजीपूरचं आंदोलन आता कमजोर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. राकेश टिकैतही सरकारला शरण जातील अशी चर्चा प्रथम सुरु झाली. पण भाजपच्या आमदारांनी इथे गुंड पाठवल्याचा आरोप करत टिकैत यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला.

त्यातच, आत्महत्या करेन पण सरकारच्या दडपशाहीसमोर झुकणार नाही हे सांगताना टिकैत यांना अश्रू अनावर झाले. हा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पश्चिमी उत्तर प्रदेशात वाऱ्यासारखा पसरला. राकेश टिकैत यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यानंतर अनेक शेतकरी गाझीपूरच्या दिशेनं पुन्हा येऊ लागले आणि या आंदोलनाला नव्याने बळ मिळाले.

दरम्यान, आज राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारशी पुन्हा चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कृषी कायद्यांसंदर्भात आम्ही पुन्हा एकदा सरकारशी चर्चा करू. जो आमचा मार्ग आहेत, त्याच्यावर चर्चा करू. यासंदर्भात आम्ही सरकारला निरोप पाठविला आहे, की आमची भारत सरकारबरोबर चर्चा करण्याची इच्छा आहे. अशी म्हणत, दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा सरकारबरोबर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.