डिसले गुरुजींनी पुन्हा उंचावली देशाची मान; मिळाले जागतिक स्तरावरील सन्मानाचे पद
देश बातमी

डिसले गुरुजींनी पुन्हा उंचावली देशाची मान; मिळाले जागतिक स्तरावरील सन्मानाचे पद

सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे रणजितसिंह डिसले यांनी देशाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. त्यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जागतिक बँकेने त्यांची शिक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. डिसले गुरुजींची जून 2021 ते जून 2024 अशा तीन वर्षांच्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील 12 व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड केली आहे.

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर हा सात कोटींचा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना प्रदान करण्यात आला होता.