महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान
देश बातमी

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली,  दि. 05 : शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने  सन्मानित करण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शैक्षणिक मोबाईल ॲप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामग्री निर्मिती, दृश्य व श्राव्य सामग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवाणी, यू-ट्यूब, आकाशवाणी, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आदींचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या  शिक्षकांना  सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान  समारंभाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह आदी उपस्थित होते.

यावेळी, महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष 2023 चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यामध्ये  शालेय विभागात आंबेगाव पुणे येथील, जिल्हा परिषद शाळेच्या मृणाल नंदकिशोर गांजाळे, उच्च शिक्षण विभागात व्हीजेटीआय मुंबईतील केशव काशिनाथ सांगळे, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेतील डॉ.चंद्रगौडा रावसाहेब पाटील, आयआयटी मुंबईतील डॉ. राघवन बी. सुनोज तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागात मुंबईतील लोअर परेल येथील गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या शिल्पनिदेशक, स्वाती देशमुख या शिक्षकांचा समावेश आहे.

श्रीमती मृणाल गांजाळे

पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पिंपळगाव महाळुंगे येथील उपक्रमशील शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांना २०२३ या वर्षाचा शालेय विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार   (National Teachers’ Award 2023) प्रदान करण्यात आला. भारतातून 50 शिक्षकांची तर महाराष्ट्रातून एका शिक्षिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना यापूर्वी २०१९ मधील राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्कार व २०२२ मधील राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.

डॉ. राघवन बी. सुनोज

प्रा. राघवन बी. सुनोज मूळचे तिरुवनंतपूरमचे आणि आयआयटी मुंबईचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांना अध्यापन आणि संशोधनासाठी सन २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आला. रसायनशास्त्रामध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले असून 2001 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरकडून त्यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला आहे. वर्ष 2012 पासून ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

प्रो.केशव सांगळे

प्रा. केशव सांगळे यांना उच्चशिक्षणातील स्थापत्य अभियांत्रिकीमधील शैक्षणिक योगदान, संशोधन, शोधनिबंध, विद्यार्थी मार्गदर्शन, शैक्षणिक प्रशासन, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संस्था, राज्य व राष्ट्रीयस्तरावर केलेली मदत, राज्य व देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम केल्याबद्दल सन 2023 या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. चंद्रगौडा  रावसाहेब पाटील

डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील यांना उच्च शिक्षणातील तंत्रज्ञान वापर, समाज उपयोगी संशोधन तसेच नाविन्यपूर्ण व विद्यार्थीभिमुख शिक्षण पध्दतीचा विकास व वापरासाठी २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

स्वाती योगेश देशमुख  हस्तकला (क्राफ्ट्स कौशल्य) प्रशिक्षक

अत्यंत समर्पित आणि कुशल संगणक कौशल्य प्रशिक्षणात उल्लेखनीय कारकीर्दीची दखल घेत, स्वाती योगेश देशमुख यांना वर्ष 2023 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांना 22 वर्षांच्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अनुभवासह, विद्यार्थ्यांना संगणक-संबंधित विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या कौशल्याचा गौरव केला गेला. त्यांनी आजपर्यंत 500+ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण आणि मदत करून सर्वसमावेशकता आणि समर्पण दर्शविले आहे.

या वर्षापासून, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यावर्षी 50 शालेय शिक्षक, उच्च शिक्षण विभागातील 13 शिक्षक आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या 12 शिक्षकांचा या पुरस्काराने पुरस्कृत केले आहे. गुणवत्तेचे प्रमाणपत्र, 50,000 रुपये आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.