१८ महिलांची हत्या करणारा सिरीयल किलर अखेर जेरबंद
देश बातमी

१८ महिलांची हत्या करणारा सिरीयल किलर अखेर जेरबंद

हैदराबाद : हैदराबादमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं, अठरा महिलांची हत्या करणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीला हैदराबाद पोलिसांनी जेरबंद केले आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे फक्त महिलांच्या हत्येचेच नाही तर अनेक गुन्हे या व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आले आहेत. तर पोलिसांना नुकत्याच झालेल्या दोन महिलांच्या हत्येचं गूढ सोडवण्यातही यश आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हैदराबाद शहर पोलीस टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी आणि रचकोंडा पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाईत करत या व्यक्तीला अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरामध्ये आरोपी व्यक्ती हा दगड तोडण्याचं काम करतो. वयाच्या 21 व्या वर्षी आरोपीचं लग्न झालं होतं. पण काही दिवसांत त्याची पत्नी दुसऱ्या तरुणासोबत पळून गेली. तेव्हापासून आरोपी महिलांचा द्वेष करू लागला. 2003 पासून तो अनेक अविवाहित महिलांना लैंगिक संबंधासाठी पैसे देण्याचं आमिष दाखवून त्यांची हत्या करायचा.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे, अशी कृत्ये करताना तो दारूच्या नशेत असायचा. महिलांची निर्घृणपद्धतीने हत्या केल्यानंतर आरोपी त्यांच्या मौल्यवान वस्तू घेऊन फरार व्हायचा. अशा वारंवारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. याआधीही त्याला 21 प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. यामधले तब्बल 16 हत्याकांड आहेत तर चार प्रकरणं मालमत्ता वादासंदर्भात असल्याचं सांगण्यात येत आहे तर एका प्रकरणात आरोपी जेलमधून फरार झाला होता. पण आता पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा श्वास घेतला.