चर्चेचं बांडगूळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे; भाजपा नेत्याचा राज्यसरकारवर हल्लाबोल
राजकारण

चर्चेचं बांडगूळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे; भाजपा नेत्याचा राज्यसरकारवर हल्लाबोल

मुंबई : “चर्चेचं बांडगूळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे. केवळ राजकीय सूडापोटी आणि मोदी द्वेषापोटी या देशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुर्दैवाने शिवसेना अराजकता आणू पाहत आहे. देश यांना सोडणार नाही.” अशा शब्दात भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि पोलीसांमध्ये प्रचंड हिंसाचार झाला. या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. याच घटनेनंतर आशिष शेलारांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की. “२००३ पासून ज्यांनी कृषी कायद्याची वकिली केली ते आज संयमाच्या चर्चेची गोष्ट करत आहेत. १४ वर्षानंतर तरी वनवास समाप्त होतो पवार साहेब…१७ वर्ष झाली कायदा आणून आणि चर्चा करुन आणि अजूनही तुम्हाला चर्चा करायची आहे. याचा अर्थ चर्चेचं बांडगूळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, “केंद्र सरकारने २०१४ पासून २०२० पर्यंत जनहिताचा निर्णय घेतला की लाँग मार्च ते आंदोलन, पुरस्कार वापसी ते पुरस्कार वापसी करणाऱ्यांचं समर्थन ही सातत्याने भूमिका या देशातील शहरी नक्षलवादी आणि खासकरुन मोदी विरोधकांनी घेतली आहे.” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

तसेच, ”हिंसाचार करणाऱ्यांविरोधात एक चकार शब्द काढला नाही. रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत? सगळ्या आंदोलनात इतर लोकांचा जो वावर आहे त्याचे समर्थक शरद पवार आणि संजय राऊत तुम्ही आहात. तुमची तोंडं आता का शिवली आहेत हा प्रश्न आम्ही तुम्हाला देशवासियांच्या वतीने विचारत आहोत,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

“पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं कोणत्या देशभक्तीत बसतं हे शरद पवार आणि संजय राऊत यांनी स्पष्ट करावं. पोलिसांवर लाठ्या उचलणं, जवानांना लाथा बुक्क्याने मारणं, तलवारी काढणं कोणत्या देशभक्तीत बसतं हे स्पष्ट करावं. या आंदोलनाला त्यांनी तीव्र रुप दिलं त्यांची चौकशी झाली पाहिजे पण ज्यांनी समर्थन दिलं त्यांचीही चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.