सिरमच्या लसीची जगात सर्वाधिक किंमत भारतात!
देश बातमी

सिरमच्या लसीची जगात सर्वाधिक किंमत भारतात!

नवी दिल्ली : देशात पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादित केली जाणारी कोविशिल्ड आणि भारत बायोटेककडून बनविली जाणारी कोव्हॅक्सिन या दोन लसींनाच देशांतर्गत वापराला मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी आत्तापर्यंत देशात झालेल्या बहुतेक लसीकरणासाठी कोविशिल्डचाच वापर करण्यात आला आहे. मात्र, नुकतीच सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी खुल्या बाजारात खासगी रुग्णालयांसाठी कोविशिल्डचे नवे दर जाहीर केले असून त्यानुसार आता खासगी रुग्णालयांना कोविशिल्ड लसीच्या प्रत्येक डोससाठी ६०० रुपये मोजावे लागणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार ही किंमत जगभरात कोविशिल्ड लस ज्या ज्या देशांमध्ये दिली जात आहे, त्यात सर्वाधिक असणार आहे. येत्या १ मे पासून लसीचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. नुकतीच केंद्र सरकारने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातल्या व्यक्तींना लस घेण्याची परवानगी देत लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर फायझर, मॉडेर्ना, स्पुटनिक व्ही अशा परदेशी लसींना देखील भारतात वितरणाची परवानगी देण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. त्यानंतर सिरमचे अदर पूनावाला यांनी देखील सिरमच्या कोविशिल्ड लसीचे नवे दर जाहीर केले आहेत. आत्तापर्यंत १५० रुपयांमध्ये कोविशिल्ड लसीचा एक डोस सरकारला घ्यावा लागत होता. आता तीच किंमत राज्य सरकारांसाठी ४०० रुपये प्रतिडोस इतकी होणार असून खासगी रुग्णालयांसाठी ती किंमत ६०० रुपये प्रतिडोस असणार आहे.

जगभरात अमेरिका, ब्रिटन, युरोपातील काही देश, बांगलादेश, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका या भागात कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, भारतातील नव्या दरांनुसार लसीचा एक डोस आंतरराष्ट्रीय दरांनुसार ८ डॉलरपर्यंत जाणार आहे. जगात कुठेही कोविशिल्ड लसीच्या डोसची इतकी किंमत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. यापैकी बहुतेक देशांमध्ये लस मोफत दिली जात असून त्याचा खर्च तेथील सरकार उचलत आहे. सध्या युरोपातील देशांमध्ये कोविशिल्डच्या एका डोससाठी २.२५ ते ३.५० डॉलर, ब्राझीलमध्ये ३.१५ डॉलर, ब्रिटनमध्ये ३ डॉलर तर अमेरिकेत ४ डॉलर इतकी किंमत मोजली जात आहे. अमेरिका आणि ब्रिटनकडून थेट अस्ट्रॅझेनेकाकडून लसीचे डोस घेतले जात आहेत.