देश बातमी

प्रियकराचा बदला घेण्यासाठी तिने रचला बलात्काराचा बनाव

हैद्राबाद : हैद्राबादमधील एका लॅब टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या मुलीनं स्वतःवर सामूहिक बलात्कार झाल्याचं तिच्या आई-वडीलांना सांगितलं. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत मंगळवारी संध्याकाळी याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याची दखल घेत तत्काळ तपास सुरू केला. पोलिस तपासादरम्यान काहीतरी वेगळचं चित्र समोर आलं आणि या घटनेला नाट्यमय वळण मिळालं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या मुलीने आपल्या आई-वडीलांना सांगितलं होतं की, मंगळवारी संध्याकाळी काम संपल्यानंतर चंद्रयानगुट्टा भागातील फिसाल बांदा इथं असलेल्या तिच्या घरी येण्यासाठी तिनं संतोषनगरमध्ये ऑटो पकडली. त्यावेळी रिक्षात दोन पुरुष बसलेले होते. काही अंतर गेल्यानंतर ती अर्धवट बेशुध्द झाली. त्यानंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन ऑटो चालक आणि इतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यात तिनी त्या प्रियकरालाही गोवलं होतं. हे ऐकून तिच्या आई-वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

असा झाला उलगडा
पोलिसांनी तपासादरम्यान तिनं सांगितलेल्या संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. पण त्यात कुठंही तिचं अपहरण झाल्याचे पुरावे मिळाले नाहीत. या मुलीकडे घटनेची चौकशी करत असताना पोलिसांना तिच्या सांगण्यात विसंगती आढळली, त्यामुळं त्यांचा तिच्यावरचा संशय बळावला. तेव्हा त्यांनी पोलिसी खाक्या दाखवत चौकशी करताच सगळं सत्य बाहेर आलं आणि या मुलीचं बिंग फुटलं. नंतर आलेल्या तिच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालातही तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचंही स्पष्ट झालं.

आपल्या प्रियकरानं दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केल्यानं या मुलीला त्याचा प्रचंड राग आला होता. त्यामुळं त्याला धडा शिकवण्यासाठी त्याचा बदला घेण्यासाठी तिनं ही बलात्काराची खोटी कहाणी तयार केल्याचं पोलिस तपासात उघड झालं. प्रेम केलेल्या व्यक्तीबद्दल सूडाची भावना बाळगून स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता असं टोकाचं पाऊल उचलणाऱ्या या मुलीच्या वर्तनाची सर्वत्र चर्चा होत आहे.