चुकीने पाकिस्तानच्या सीमेत गेलेल्या मेंढपाळाची १३ वर्षांनी सुटका
देश बातमी

चुकीने पाकिस्तानच्या सीमेत गेलेल्या मेंढपाळाची १३ वर्षांनी सुटका

नवी दिल्ली : रस्ता भरकटून चुकून पाकिस्तानच्या सीमेमध्ये गेलेल्या एका मेंढपाळाची तब्बल १३ वर्षांनी सुटका करण्यात आली आहे. गुप्तहेर असल्याचा आरोप करत त्याला अटक करून पाकिस्तानच्या जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. मात्र आता पाकिस्तानच्या कारागृहात अनेक वर्ष काढल्यानंतर हा मेंढपाळ भारतात परतला आहे. इस्माईल समा असा या मेंढपाळाच नाव आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सीमेपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कच्छ जिल्ह्यातील नाना दिनारा गावातील 60 वर्षीय इस्माईल समा राहतात. २००८ मध्ये एके दिवशी आपल्या मेंढ्या चारत असताना चुकून त्यांनी पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश केला. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय उच्चायुक्तानी याबाबत याचिका दाखल केल होती. त्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दोन दिवस आधीच इस्माईल समा यांची मुक्तता करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना समा म्हणाले की, ” २००८ मध्ये मी आपल्या मेंढ्यांना चारत असताना चुकून पाकिस्तानच्या दिशेनं गेलो होतो. त्यांनी मला एक गुप्तहेर आणि RAW एजंट म्हणून अटक केली. आयएसआयने मला 6 महिने कारागृहात ठेवलं. त्यानंतर मला पाकिस्तानच्या सैन्याकडे सोपवण्यात आलं. 5 वर्षे शिक्षा सुनावली जाण्यापूर्वी मी 3 वर्षे त्यांच्या ताब्यात होतो. ऑक्टोबर 2016 मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही माझी सुटका करण्यात आली नाही. मी 2018 पर्यंत हैदराबाद सेंट्रल जेलमध्ये होतो. त्यानंतर मला दोन अन्य भारतीय कैद्यांसोबत कराचीच्या कारागृहात पाठवण्यात आलं” अशी माहिती इम्साईल समा यांनी दिली आहे.

अटारीमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी वाघा-अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवरुन इस्माईल समा हे अमृतसरला पोहोचले. यावेळी त्यांचे काही कुटुंबीयही त्यांना घेण्यासाठी वाघा-अटारी बॉर्डरवर आले होते. त्यानंतर अमृतसरमध्ये काही औपचारिक गोष्टी आणि समा यांच्या आरोग्य तपासणीनंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केलं जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

याबाबत पत्रकार जतिन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, समा यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तान-इंडिया पीपल्स फॉर पीस अँड डेमोक्रसी आणि अन्य एका स्थानिक एनजीओने दोन्ही सरकारकडे संपर्क सुरू केला. त्याचबरोबर पाकिस्तान उच्चायुक्तांना एक पत्र लिहिलं आणि समा यांच्या सुटकेची मागणी केली. समा यांची सुटका ही भारतीय उच्चायुक्तांनी चार भारतीय कैद्यांच्या सुटकेसाठी याचिका दाखल केल्यानंतर होऊ शकली आहे.