दिल्ली पोलीस शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देणार?
देश बातमी

दिल्ली पोलीस शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देणार?

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. मात्र या रॅलीला सरकारकडून विरोध करण्यात आला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या परवानगीने रॅली काढण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांकडे रॅली काढण्यासाठी रितसर परवानगी मागितली आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात पोलिसांकडून साडेचार वाजता महत्त्वाची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना यासंदर्भात निर्णय घेण्याची सूचना केली होती. त्यानंतर आता दिल्लीचे विशेष आयुक्तांनी (गुप्तचर) पत्रकार परिषद बोलवली असून, त्यावेळी माध्यमांना ट्रॅक्टर रॅली संदर्भात माहिती देणार आहेत. तर ट्रॅक्टर रॅली बाबत माहिती देताना शेतकरी नेते सतनाम सिंह पन्नु यांनी सांगितलं की, “आमच्या मागण्यां सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला शांततेत ट्रॅक्टर रॅली काढायची आहे. ट्रॅक्टर शिस्तबंधपणे काढली जाईल. या रॅली रुग्णवाहिकाही असेल. त्याचबरोबर दिल्लीच्या सीमेवरून ही रॅली काढण्यात येईल.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांकडे अर्ज केला होता. यात सहमतीने ठरवण्यात आलेल्या मार्गाने रॅली काढण्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या काही अटीदेखील आहेत. मात्र, पोलिसांच्या परवानगीनंतर शेतकऱ्यांना रॅली काढता येणार असून, सायंकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेनंतरचं रॅलीच भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं लक्ष दिल्ली पोलिसांच्या निर्णयाकडे लागलं आहे.

तर दुसरीकडे, दिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांव्यतिरिक्त, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागात, 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर परेडसाठी शेतकरी जमले आहेत. शनिवारी अलिगडमध्ये शेतकऱ्यांनी 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर परेडसाठी रंगीत तालीम केली. बरेच शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन दिल्लीकडे जाण्यास सुरवात झाली आहे, मात्र पोलिस प्रशासन त्यांना वाटेतच थांबवत आहेत.

तर अमरोहाहून आणखी 50 ट्रॅक्टरचा ताफा दिल्लीकडे रवाना झाली आहे. शेतकरी ट्रॅक्टरवर घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तसेच, पंजाबच्या बरनाळ्यात, ट्रॅक्टर रॅलीच्या तयारीची छयाचित्रे पाहण्यासारखी आहेत. शनिवारी ट्रॅक्टरची एक तुकडी दिल्लीकडे रवाना झाली आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या सीमेवर जाणऱ्या शेतकऱ्यांचा उत्साह मोठा असला तरी प्रजासात्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा यंत्रणांसाठी देखील ही परिस्थिती एका परीक्षेप्रमाणेच असणार आहे.