जावयांकडे गाड्या, पण सासुरवाडीला येईनात, लेकी हिरमुसल्या, कारण तरी काय?
पश्चिम महाराष्ट्र बातमी

जावयांकडे गाड्या, पण सासुरवाडीला येईनात, लेकी हिरमुसल्या, कारण तरी काय?

शिर्डी: रस्त्यांची इतकी दुरवस्था झाली की पाचही जावयांनी आमच्या घरी येणं जाणंच बंद केलं, रस्त्यावर गाडी लावून घरी यावं लागत असल्याने जावई थांबत नाही या रस्त्यांमुळेच जावई आमच्या घरी यायचे बंद झाले असल्याची संतप्त प्रतिक्रिया एका ग्रामस्थ महिलेने दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१५ वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था

अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारातील आहेर वस्ती, नन्नावरे वस्तीच्या रस्त्यांची गेल्या १५ वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. एखादा माणूस आजारी पडला तर त्याला या रस्त्यांवरुन रुग्णालयात घेउन जाणं देखील कठीण झालं आहे. शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाणं सुद्धा अवघड बनलं आहे.

ग्रामस्थांचे प्रचंड हाल

ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत असताना ग्रामपंचायतीने अद्यापही रस्त्यांची कामे केलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायतीचा निषेध नोंदवला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळेच माझ्या पाचही जावयांनी आमच्या घरी येणं जाणं बंद केले असल्याची संतप्त प्रतिक्रिया महिला ग्रामस्थ सुमन गुडघे यांनी व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

प्रत्येक निवडणुकीत आहेर वस्ती नन्नवरे वस्ती येथील ग्रामस्थांना रस्त्यांची कामे करू अशी आश्वासने राजकारण्यांकडून दिली जातात. मात्र, गेली तीन पंचवार्षिक पासून रस्त्यांची अवस्था जैसे थेच असून कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका १८ डिसेंबरला पार पाडणार असून या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संतत्प ग्रामस्थांनी दिला आहे.

चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये आहेर वस्ती आणि नन्नावरे वस्ती येत असून या ठिकाणी ४०० मतदार आहेत. या ४०० मतदारांनी यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.