धक्कादायक ! बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या
बातमी महाराष्ट्र

धक्कादायक ! बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर : आनंदवनात कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. शीतल आमटे दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात होत्या. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेऊन त्यांनी आत्महत्या केली. वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओपदी त्या कार्यरत होत्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. डॉक्टरीसेवा करत असतानाच सोशल आंत्रप्रनरशिप अभ्यासक्रम पूर्ण करून हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजन करणं असो की आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं असो, अपंगांसाठी ‘निजबल’ आणि बेरोजगार युवकांसाठी ‘युवाग्राम’ उपक्रम राबवणे असो, ‘आनंद मूकबधिर विद्यालय’ आणि ‘आनंद अंध विद्यालय’ या शाळांचं डिजिटलाझेशन असो किंवा मियावाकी पद्धतीने चार जंगलं वसण्याचं पर्यावरणीय योगदान असो, आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा डॉक्टर शीतल आमटे, सशक्तपणे पुढे चालवत होत्या.

मात्र मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला होता. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. शीतल आमटे यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.