भाजपच्या उपमहापौरांना अटक; चंद्रकांत पाटलांच्या भुमिकेकडे लक्ष
पश्चिम महाराष्ट्र बातमी

भाजपच्या उपमहापौरांना अटक; चंद्रकांत पाटलांच्या भुमिकेकडे लक्ष

सोलापूर : सोलापूरमधील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक करण्यात आली आहे. बेकायदा कामांसाठी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांना शिवीगाळ आणि उपायुक्त धनराज पांडे यांना पाच लाखांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप होता. तसेच अन्य एका अधिकाऱ्याला बेकायदा काम करण्यासाठी धमकावल्याचाही आरोप होता. अखेर एका आठवड्यानंतर राजेश काळे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या प्रकरणी महापालिकेतील सत्ताधारी भाजपची प्रतिमा आणखी मलिन झाल्यामुळे शेवटी पक्षाने त्यांना शिस्तभंग कारवाई हाती घेतली आहे. पक्षातून काळे यांना बडतर्फ करण्याबाबत अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे घेणार असल्याचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या २९ डिसेंबर रोजी रात्री यासंदर्भात पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात राजेश काळे यांच्याविरोधात फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर मंगळवारी सकाळी राजेश काळे सोलापूरहून पुण्याला जात असताना वाटेत टेंभुर्णीजवळ शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना सोलापुरात आणल्यानंतर अटकेची कारवाई पूर्ण झाली. काळे यांच्या विरूद्ध हा पहिलाच गुन्हा नोंद नाही तर यापूर्वीही काही गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे पोलिसांत दाखल आहेत. यात पुण्यात पिंपरी-चिंचवड येथील एका गुन्ह्याचाही समावेश आहे.