मराठा आरक्षणासाठी राज्यस्तरीय बैठक संपन्न; झाला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी राज्यस्तरीय बैठक संपन्न; झाला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुंबई : ”मराठा आरक्षणावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ८ डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. आज पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मराठा आरक्षणावर स्थगिती असल्याने महाराष्ट्र सरकार कश्याप्रकारे मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नोकरी किंवा इतर बाबतीत न्याय देऊ शकेल, या बाबत वकील , तज्ञ , मराठा आरक्षण अभ्यासक यांनी तयार केलेले मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले. तसेच, मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून अद्याप आरक्षणावर ठोस निर्णय झालेला नाही. कोणत्याही सरकारने यावर ठोस निर्णय घेतला नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. असाही निष्कर्ष यावेळी काढण्यात आला. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यामुळे विद्यार्थी वर्गांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केलं.

याबाबत बोलताना कोंढरे म्हणाले की, “राज्यात मुंबईत अधिवेशन होत असून त्या पार्श्वभूमीवर अनेक विषयावर चर्चा झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थी तरुणांची भरती झाली नाही. त्याच्या निषेधार्थ १ आणि २ डिसेंबर रोजी राज्यातील महावितरण अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी प्रत्येक जण वाहनातून विधान भवन येथे धडक मोर्चा काढणार आहे. पण एखाद्या वेळेस अधिवेशन पुढे घेतल्यास पुढील दिशा देखील लवकरच ठरविली जाईल,” असं कोंढरे यांनी सांगितलं.

तसेच, “राज्यातील मराठा समाजाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. यामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता राज्याचे महत्त्वाचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर पक्षांच्या सर्व प्रमुख नेते मंडळीनी एकत्रित बसून चर्चा केल्यास मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो,” अशी भूमिका राजेंद्र कोंढरे यांनी मांडली.