घरात राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी – राहुल प्रधान
बातमी महाराष्ट्र

घरात राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी – राहुल प्रधान

नांदेड : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. अशा परिस्थितीत घरात राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांनी केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रधान म्हणाले, एप्रिल महिन्यात आपण दोन दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतो. एक म्हणजे ज्योतिबा फुले आणि दुसरा दिवस म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती. हे दोन दिवस आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असतात. परंतु, गेल्यावर्षीपासून हे दोन दिवस उत्सव म्हणून साजरा करण्यात खंड पडला आहे. मागील वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक लॉकडाऊन होता. तर यावर्षीही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी आणि संचारबंदी आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती घरात राहूनच अभिवादन करून साजरी करावी.

आंबेडकरी चळवळीतील युवक हा प्रचंडल संयमी आहे. पण त्याचवेळेस तो स्वतःच्या अस्मितेबाबत प्रचंड जागरूक आणि संवेदनशील देखिल आहे. फुले आंबेडकर जयंती तर त्यांच्या प्रचंड जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जयंतीसारख्या कार्यक्रमात अनेक लोक एकत्र येण्याची शक्यता असते. त्यातून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी सार्वजनिक पातळीवर जयंती साजरी न करणे योग्य राहील असे राहूल प्रधान यांनी म्हटले आहे.

जयंतीनिमीत्त वेगवेगळे मतप्रावाह समोर येत असून खास करून तरूण पिढी उत्साहात जयंती साजरी करण्याच्या मनस्थितीत आहे. परंतु, उत्साही तरुण मित्रांनी हे समजून घेतले पाहिजे की जयंतीनिमीत्त घरातील प्रत्येक लहानपासून थोरापर्यंत सर्वजण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रस्त्यावर येतात. अशा परिस्थितीत कोरोना हा रोग संसर्गजन्य असून तो लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांसाठी घातक आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांची जयंती करणे चुकीचे ठरेल असेही राहूल प्रधान यांनी सांगितले आहे.