एलपीजी सिलेंडर्सच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री 
देश बातमी

एलपीजी सिलेंडर्सच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री 

नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. गेल्या महिन्यातही गॅस सिलिंडरच्या किंमतीत सुमारे 100 रुपयांची वाढ करण्यात आली होती. १ जानेवारीपासून व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतीत ही वाढ करण्यात आली आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडर्सच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीत सुमारे 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती वापराच्या १४.२ किलो सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून, १९ किलो सिलेंडरच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे. यानंतर मुंबईत १९ किलोचा सिलेंडर १७ रुपयांनी महाग झाला असून, आता एलपीजीच्या या सिलेंडरसाठी १२९७.५० रुपये मोजावे लागतील. तर १४.२ किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी मुंबईत ६९४ रुपये, कोलकातामध्ये ७१० रुपये आणि राजधानी दिल्लीत ६९४ रुपये आकारले जातात.

तेल कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या दराचा आढावा घेतला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाची किंमत आणि विनिमय दर यांनुसार देशातील सिलेंडरच्या दरात बदल केला जात असतो, असे सांगितले जाते. प्रत्येक राज्यातील करांनुसार, घरगुती सिलेंडरचा दर वेगवेगळा असतो. १४.२ किलोचा एलपीजी सिलेंडर वापरला जात असल्यामुळे याला सरकारकडून १२ सिलेंडरवर अनुदान दिले जाते. यापेक्षा अधिक सिलेंडर हवा असल्यास तो उपलब्ध बाजारमूल्यांनुसार ग्राहकाला खरेदी करावा लागतो.

तर, १९ किलोच्या सिलेंडरचा नवा दराबाबत मिळालेल्या माहितीनुसार, १९ किलोच्या व्यवसायिक स्वरुपात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडर दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईत १९ किलोचा एलपीजी सिलेंडर १७ रुपयांनी महाग झाला असून, आता तो १२९७.५० रुपयांना मिळेल. यापूर्वी याचा दर १२८०.५० रुपये होता. तर कोलकाता येथे एलपीजी सिलेंडर १३८७.५० रुपयांवरून १४१० रुपये झाला आहे. कोलकातामध्ये २२ रुपयांनी सिलेंडर महागला आहे. तर राजधानी दिल्लीतही १७ रुपयांनी महागलेला १९ किलोचा एलपीजी सिलेंडर आता १३४९ रुपयांना मिळेल. याआधी दिल्लीत याचा दर १३३२ रुपये होता.

गेल्या महिन्यात गॅस सिलिंडर्सच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली होती. घरगुती एलपीजीच्या किंमतीत दोनदा सुमारे 100 रुपयांची वाढ झाली, त्यानंतर दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडर आता 694 रुपये झाला आहे. 5 किलो छोट्या सिलिंडरच्या किंमतीत 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर व्यावसायिक वापरासाठीच्या 19 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत 36.50 रुपयांची वाढ झाली. तेल कंपन्या दरमहा एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतात. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असतो आणि त्यानुसार एलपीजीच्या किंमती वेगवेगळ्या असतात