मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटक प्रकरणातील तपास अधिकारी बदलला
देश बातमी

मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटक प्रकरणातील तपास अधिकारी बदलला

मुंबई : देशातील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याच्या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलण्यात आला आहे. क्राईम ब्रँचच्या सीआययु युनिटचे एपीआय सचिन वाझे यांच्या ऐवजी तपास सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ गेल्या आठवड्यात संशयित कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

क्राईम ब्रँचच्या सीआययु या युनिटचे प्रमुख ए पी आय सचिन वाझे हे आहेत. वाझे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला होता. मात्र, तपासात प्रगती नसल्यानं तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. 25 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता.

दरम्यान, जिथं स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते अंबानींचं अँटेलिया हे देशातील सर्वात महागडं हे घर आहे. दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर हा बंगला आहे. या बंगल्यात एकूण 27 मजले आहेत. या बंगल्याच्या इंटेरियरवर बरंच काम करण्यात आलं आहे. 4 लाख चौरस फुटांवर असलेली ही इमारत 570 फूट उचं आहे. फोर्ब्सच्या मते, या घराची किंमत जवळजवळ 6 हजार कोटी रुपये आहे. तर डॉलरमध्ये याची किंमत 2 बिलियन डॉलर( जवळजवळ 125 अब्ज) आहे. तसंच ही इमारत उभारण्यास तब्बल 11 हजार कोटी रुपये खर्च आला होता.