पुण्यातील भाजप आमदाराच्या घरी चोरी: १८ लाखाचा ऐवज लंपास
पुणे बातमी

पुण्यातील भाजप आमदाराच्या घरी चोरी: १८ लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिशाळ यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी १८ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. मिसाळ यांच्या पुण्यातील वानवडी भागात बंगला असून चोरीच्या प्रकरणात मिसाळ यांचा जवळच्याच व्यक्तीवर संशय आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याप्रकरणी ममता दीपक मिसाळ (वय 51, रा. बंगला क्रमांक 2, फेअर रोड, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. ममता या आमदार माधुरी मिसाळ यांच्या जाऊ आहेत. मिसाळ कुटुंबाने दिवाळीच्या सणाच्यावेळी परिधान करण्यासाठी बॅंकेच्या लॉकरमधून 14 लाख रुपये किंमतीचा हिरेजडीत सुवर्णहार व चार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे कडे असे दागिने असलेला बॉक्‍स घरी आणला होता. ते दागिने दिवाळीमध्ये परिधान केल्यानंतर ममता मिसाळ यांनी त्यांच्या बेडरुममधील कपाटात ठेवले होते.

त्यानंतर आमदार मिसाळ यांच्यासह ममता यांना 18 तारखेला एका कामानिमित्त मुंबईला जायचे होते. तेथून आल्यानंतर त्यांनी घरामध्ये दागिन्यांचा शोध घेतला. परंतु ममता यांना त्यांच्या कपाटामध्ये दागिने आढळले नाहीत. त्यांनी संपूर्ण घरामध्ये दागिन्याचा शोध घेतला. तरीही दागिने न सापडल्याने त्यांनी वानवडी पोलिस ठाण्यात 29 नोव्हेंबरला फिर्याद दाखल केली. दरम्यान, आमदार मिसाळ यांनी त्यांच्या घराच्या परिसरातील सर्व सीसीटीव्हीचे सुमारे एक महिन्यांचे चित्रीकरण पोलिसांकडे सुपुर्द केले आहे. दागिने चोरी करणारी व्यक्ती मिसाळ यांच्या कुटुंबीयांच्या परिचयाच्या असल्याचा त्यांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांकडून त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची चौकशी केली.