शेतकरी विरोधी वक्तव्यावरून रावसाहेब दानवेंविरोधात महाराष्ट्र पेटला
राजकारण

शेतकरी विरोधी वक्तव्यावरून रावसाहेब दानवेंविरोधात महाराष्ट्र पेटला

मुंबई : ”दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून यात चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही” केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं होतं. या विधानावरून आता महाराष्ट्रात राजकारण तापलं असून दानवे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु आहेत. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यविरोधात पिंपरी चिचवड, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यात निदर्शने करण्यात आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अन्यथा शेतकरी भाजपला योग्य तो धडा शिकवतील
रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्येही उमटल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेने दानवे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. शेतकऱ्यांना उद्देशून दानवे नेहमीच अवमानकारक भाष्य करत असतात. म्हणूनच त्यांना मंत्री पदावरून पायउतार करावे, अन्यथा शेतकरी भाजपला योग्य तो धडा शिकवतील, असा इशारा शिवसेनेने दिला.

रावसाहेब दानवे यांना काळे फासल्याशिवाय स्वस्त बसणार नाही : अर्जुन खोतकर
शेतकरी आंदोलनाचा संबंध चीन पाकिस्तानशी जोडणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी खरपूस समाचार घेतला. दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून लातूर शहरात रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन दहन केले. दानवे हे पागल झाले असून त्यांना आता वेड्याचे झटके येत असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असल्याचे सांगत, दानवे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे पट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ खोतकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

भिवंडी, अकोला, अकोटमध्येही दानवेंचा निषेध 

त्याचबरोबर, शिवसेना भिवंडी नेते करसन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी बायपास येथे इंधन दरवाढ आणि रावसाहेब दानवे यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याबद्दल निषेध मोर्चा करण्यात आला. राज्यात अकोला, तेल्हारा आणि अकोटमध्ये शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आंदोलन करत गाढवाला दानवे यांची प्रतिमा बांधत निषेध केला आहे.

दरम्यान, ”रावसाहेब दानवे यांचे कर्तृत्व शून्य आहे. मागे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे तर आता नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादावर ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे मोठे होतात तसेच ते पुढे आले आहेत,” अशी घणाघाती टीका माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केली. तसेच, सत्ता कधीच जाणार नाही या अविर्भावात त्यांचे वर्तन असते. असेही त्यांनी म्हंटले.