मेढा घाटात मोटार दरीत कोसळून तीन ठार; पाच जण गंभीर
पश्चिम महाराष्ट्र बातमी

मेढा घाटात मोटार दरीत कोसळून तीन ठार; पाच जण गंभीर

सातारा : जावळी तालुक्यातील मेरुलिंग-मेढा या घाटात चालकाचा ताबा सुटून मोटार थेट दरीत कोसळल्याने भयंकर अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये चालकासह एकूण तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

घरगुती व किराणा सामान आणण्यासाठी गाडी मेढ्याकडे (ता. जावळी) जात असल्याचे सांगितले जात आहे. गाडीमध्ये एकूण आठ प्रवासी बसले होते. दरम्यान, मेरुलिंग घाटात आल्यानंतर एका अवघड वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटूला. त्यानंतर गाडी थेट दरीत कोसळली. यामध्ये चालकासह तीन जण जागीच ठार झाले.

अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात मोटार पूर्ण चेपल्याने दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढण्यात आले. मोठ्या परिश्रमानंतर स्थानिकांना त्यांना बाहेर काढण्यात यश आले.

मोटार चालक शिवाजी जगन्नाथ साबळे (वय ४०), लिलाबाई गणपत साबळे (वय ५५), सागर सर्जेराव साबळे (वय ३२) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.