महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन; असे असतील नियम
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन; असे असतील नियम

मुंबई : मागील काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असताना रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाउन/ कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राज्यात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कठोर लॉकडाऊन लागू असणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं मलिक यांनी सांगितलं.

https://twitter.com/MumbaiNCP/status/1378703946705895432

मलिक म्हणाले, उद्या रात्री (५ एप्रिल) ८ वाजेपासून ही नियमावली लागू होईल. रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी असेल. इतर वेळी जमावबंदी आदेश लागू असतील. सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील. उद्योग संपूर्ण क्षमतेनं सुरू राहणार असून, कामगारांवर बंधनं नसतील. जिथे कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामं सुरू राहतील. मंडईत निर्बंध नसतील, पण गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन असेल. हा निर्णय मंत्रिमंडळाने एकमताने घेतला आहे.