कलादिग्दर्शकाच्या आत्महत्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक
पुणे बातमी

कलादिग्दर्शकाच्या आत्महत्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

पुणे : कलादिग्दर्शक राकेश साप्ते यांनी ३ जुलै रोजी पुण्याच्या वाकड परिसरातील त्यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी राकेश मौर्याला आज (ता. १५) वाकड पोलिसांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरच्या पिंपरी परिसरातील एका हॉटेलमधून अटक केली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ९ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राकेश मोर्या हा संबंधित हॉटेलमध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासंदर्भात वकिलाशी बोलणी करण्यासाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पावलं उचलत त्याला अटक केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजेश साप्ते यांनी ३ जुलै रोजी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. तसेच, एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला होता. यामध्ये त्यांनी आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावं घेतली होती. पाच आरोपींनी राजेश साप्ते यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. लेबरला कामावर येऊ देणार नाही, व्यावसायिक नुकसान करू अशी धमकी दिल्याची तक्रार राजेश साप्ते यांच्या पत्नी सोनाली साप्ते यांनी फिर्यादीत केली होती. राजेश साप्ते यांच्याकडे दहा लाख रुपये एकरकमी आणि प्रत्येक प्रोजेक्टसाठी एक लाख रुपये मागणी करण्यात आली होती. तसेच, अडीच लाख रुपये देण्यास भाग पाडण्यात आल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

राजेश साप्ते यांनी आत्महत्या रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये राकेश मौर्या त्रास देत असल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने नरेश विश्वकर्मा मिस्त्री, गंगेश्वर श्रीवास्तव, राकेश मौर्या, चंदन रामकृष्ण ठाकरे आणि अशोक दुबे अशा लोकांवर गुन्हा दाखल केला. त्याशिवाय साक्षीदारांच्या जबाबानंतर दीपक खरात नावाच्या अजून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दीपक खरात राकेश मौर्या आणि गंगेश श्रीवास्तव यांच्यासाठी वसुली करत होता. राजेश साप्ते यांना देखील दीपक खरात याने धमकावल्याची माहिती साक्षीदारांच्या जबाबातून समोर आलं आहे.