दिल्लीत वीकेण्ड कर्फ्यू; मुख्यमंत्र्यांची घोषणा
देश बातमी

दिल्लीत वीकेण्ड कर्फ्यू; मुख्यमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता विकेण्ड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वीकेण्ड कर्फ्यू लावत असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जतनेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्वाच्या गोष्टींना कर्फ्यू पासच्या माध्यमातून परवानगी असेल असं केजरीवाल म्हणाले.

कर्फ्यूमध्ये सभागृह, मॉल, जीम आणि स्पा बंद असणार आहेत. तर चित्रपटगृहांना ३० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी आहे. तसंच बाहेर जेवण्याला बंदी असून होम डिलिव्हरीची परवानगी आहे. आठवडी बाजारांना परवानगी आहे, मात्र त्यांना निर्बंधाचं पालन करावं लागेल. कर्फ्यूमध्ये लग्नासाठी जाणाऱ्यांना ई-पास दिला जाईल. हे सर्व निर्बंध तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहेत. यामुळे थोडी अडचण होईल पण कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध गरजेचे आहेत, असं सांगत केजरीवाल यांनी लोकांना न घाबरण्याचं आवाहन केले आहे.

नायब राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीनंतर वीकेण्ड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेडची कमतरता नसल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसंच सार्वजनिक ठिकाणी निर्बंधांची कडक अमलबजावणी करणार असल्याचं केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांनी आधी कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन हा उत्तम पर्याय नसल्याचं सांगताना जर आरोग्य व्यवस्था ढासळली तरच तो लावला जाईल असं स्पष्ट केलं आहे.