मोठी बातमी ! वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी ! वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमित देशमुख यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली. अमित देशमुख यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेनंतर जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे.

कोरोनाचा कहर वाढत असताना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती. यानंतर अमित देशमुख यांनी ७२ तासांत यासंबंधी निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं होतं. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही, मात्र विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्याशी चर्चा करून परिक्षांसंदर्भात पुढील ७२ तासात निर्णय घेऊ असं ते म्हणाले होते.