वाह, क्या बात है! पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला वडिलांचा कडक सॅल्यूट
देश बातमी

वाह, क्या बात है! पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला वडिलांचा कडक सॅल्यूट

तिरुपती : आपल्या मुलांनी यशाचे शिखर गाठावे असे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते आणि ते पूर्ण झाले की, त्याच्याही ऊर अभिमानाने भरून येतो. असाच एक क्षण पाहायला मिळाला. आंध्र प्रदेश पोलिस दलात मंडळ निरीक्षक पदावर असलेल्या एका पित्याने पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला सर्वांच्या समोर सॅल्यूट केला. हा भावनिक क्षण आंध्र प्रदेश पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. यानंतर हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचे समजते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आंध्र प्रदेश पोलिस दलात मंडळ निरीक्षक असलेल्या श्याम सुंदर यांची मुलगी येंदलुरु जेसी प्रसनती ही गुंटूर जिल्ह्याची पोलिस उपअधीक्षक म्हणून रुजू झाली आहे. ०४ जानेवारी ते ०७ जानेवारी या कालावधीत तिरुपती येथे होत असलेल्या आंध्र प्रदेश पोलिस दलाच्या मेळाव्याप्रसंगी या दोघांची भेट झाली. उपअधीक्षक असलेली मुलगी समोर येताच वडिलांनी चक्क सर्वांसमोर तिला सॅल्यूट केले आणि हा सुंदर क्षण आंध्रप्रदेश पोलिसांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला.

”पोलिसांच्या मेळाव्याप्रसंगी ड्युटीवर असताना प्रथमच आम्ही दोघे एकमेकांसमोर आलो. जेव्हा त्यांनी मला सँल्युट केला, तेव्हा मला अवघडल्यासारखे वाटत होते. काही झाले तरी, शेवटी ते माझे वडील आहेत. मला सॅल्यूट करू नका, असे मी त्यांना सांगितले. मात्र, त्यांनी सॅल्यूट केला. मग मीदेखील त्यांना सॅल्यूट केला, अशी प्रतिक्रिया डीसीपी जेसी यांनी दिली.

वडिलांसाठीही हा क्षण अभिमानास्पद असाच होता. माझे वडील हे माझ्यासाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहिलेले आहेत. जेसी या २०१८ च्या तुकडीतील डीएसपी आहे. वडिलांना अथकपणे जनतेची सेवा करताना मी कायम पाहिले आहे. हे पाहतच मी मोठी झाली आहे. मिळेल त्या सर्व मार्गांनी त्यांनी लोकांना मदतच केली आहे. त्यामुळेच मीदेखील पोलिस दलाची निवड केली. पोलिस विभागाकडे पाहण्याचा माझा अत्यंत सकारात्मक दृष्टीकोन आहे, असेही त्या म्हणाल्या.