पुणे पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका काय?
राजकारण

पुणे पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधी पक्षांना त्यांनी उमेदवार न देण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, या पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आमची शिवसेनेची युती आहे. आम्ही शिवसेनेला विनंती केली होती की, त्यांनी या दोन्ही जागा लढवाव्या. कारण कसब्याच्या जागेवर काँग्रेसचा पराभव झाला आहे आणि राष्ट्रवादीने इथे उमेदवारच जाहीर केला नव्हता, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. मात्र, शिवसेना या जागांवर लढणार असेल, तर नक्कीच आमचं समर्थन असेल, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

बिनविरोधी ही संकल्पनाच नाही,

दरम्यान, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपा आणि शिंदे गटाचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षांशी संपर्कदेखील केला आहे. याबाबत विचारलं असता, लोकशाहीत बिनविरोधी ही संकल्पनाच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच एखाद्या आमदाराचे निधन झाले, तर त्यांच्याबद्दल सहानुभूती असेल, याबाबत दुमत नाही. मात्र, येथील निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये. ही संकल्पना लोकशाहीत बसत नाही. त्यामुळे लोकांना नवीन लोकप्रतिनिधी निवडू द्यावे, या मताचा मी आहे, असेही ते म्हणाले.