पुणे महापालिकेतील सत्तापक्षास श्रेय देण्याचा प्रकार केविलवाणा- काँग्रेस
राजकारण

पुणे महापालिकेतील सत्तापक्षास श्रेय देण्याचा प्रकार केविलवाणा- काँग्रेस

पुणे : कोरोना युद्धात महाआघाडी सरकारने जे कौतुकास्पद काम केले आहे त्या बद्दल राज्यसरकारचे अभिनंदन करायचे सोडून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सतत राजकारण केले. मनाचा मोठेपणा दाखवत राज्य सरकारच्या प्रयत्नांचा पालकमंत्री व ऊपमुख्यमंत्री यांनी घेतलेल्या आढावा बैठका, राज्य सरकारच्या गाईड लाईन्सची विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व प्रशासन, मनपाचे सर्व आरोग्य अधिकारी यांनी केलेली अंमलबजावणी व घेतलेले श्रम यांचा त्यांनी खुले मनाने स्वीकार केला असता तर प्रगल्भ विरोधी पक्षनेता अशी प्रतिमा ते करु शकले असते..! पंरतु, सतत डोक्यात संकूचित श्रेयनादाचे राजकारण घेऊन वावरणा-या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ती संधी गमवली असल्याची खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्याचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी आज झालेल्या आभासी पत्रकार परिषदेत केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सहकार्याने गुगल मीटच्या माध्यमातून करोना संसर्ग, सद्यस्थिती, पुणे शहर आणि लसीकरण या ज्वलंत विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तिवारी बोलत होते. पुण्यात येऊन पुणे महानगरपालिकेचे कौतुक करणा-या या वृत्तीचा आम्ही धिक्कार करतो. केंद्र सरकारचा ब-याच पताळ्यांवर असहकार असतांना, कामात खोडे घालण्याची वृत्ती वेळोवेळी सिद्ध होत असतांना महाआघाडी सरकारने कोणत्याच पातळीवर त्रागा न करता संयमाने आणि सामंजस्याने परिस्थिती हाताळली. भाजप शासित राज्यांपेक्षा ही, महाराष्ट्राने राज्याची आर्थिक घडी न बिघडू देता कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणली. केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणांमुळे देखील राज्य सरकारला अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागत आहे. राज्यातील विरोधी पक्ष आणि केंद्र सरकार राज्यातील महाआघाडी सरकारला सतत अडचणीत आणण्याचा व कोंडीत पकडण्याचा प्रयत्नात आहे. पंरतू, अशा कठीण परिस्थीतीत एकदिलाने, एकमनाने आणि एकविचारांनी काम करणे अपेक्षित असतांना विरोधी पक्ष नेता जबाबदारीने वागत नाही आहे. हे वर्तन महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय वारशाला धरुन नसल्याची टीका देखील तिवारी यांनी यावेळी केली.

तिवारी म्हणाले, उच्च न्यायालयाची चपराक दिल्यानंतर ही पुणे महानगरपालिका त्यांचा डॅश बाोर्ड अद्ययावत करीत नाही आहे. हे पुणे मनपाचे अपयश आहे मुंबई महापालिका जर डॅश-बोर्ड अद्ययावत करु शकते तर माहिती-तंत्रज्ञानाचे हब असलेल्या पुण्याच्या महापालिकेला ते का शक्य होत नाही. सर्वसामान्य नागरिक डॅश बोर्ड अद्ययावत नसल्याने हवालदिल होऊन मिळेल त्या हॉस्पिटलमध्ये अव्वाच्या सव्वा पैसा मोजून रुग्ण भरती करीत आहे. डॅशबोर्डवर योग्य वेळी योग्य बेड्सची माहीती न मिळाल्यामुळे गरजूंना महागातील खाजगी हॅास्पीटल्सचे बेड्स मजबूरी ने घ्यावे लागत आहेत. याचे बेड्स वाटपाचे खरेतर ॲाडीट होण्याची गरज आहे, असेही त्यांना सांगितले.

पुण्याची कोरोना परिस्थिती आता नियंत्रणात येत आहे. यात पुणे मनपातील भाजप सत्ताधारी एकमेव कौतुकाचे पात्र नसून आरोग्य यंत्रणा, आरोग्य मंत्री, संपर्क मंत्री वेळोवेळी घेत असलेल्या आढावा बैठका आणि त्या बैठकांमधून होत असलेले सरकारचे निर्देश व मार्गदर्शन देखील प्रशंसनिय आहे. महाआघाडीच्या बैठकांमधून होणा-या मार्गदर्शक तत्वांवरच पुणे मनपा प्रशासकीय यंत्रणा काम करीत असतांना पुणे मनपातील भाजप सरकार केवळ एकटेच श्रेय कसे घेऊ शकते, असा खडा सवाल देखील गोपाळ तिवारी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

पुणेकरांनी महाआघाडी सरकारच्या आवाहानास प्रतिसाद देत लॉकडाऊनला पाठिंबा दिल्यानेच, आज रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. लॉकडाऊन स्विकारला म्हणून रुग्ण संख्या नियंत्रणात आली. हेच भाजप सरकार व्यापा-यांची डोके भडकवून लॉकडाऊनला विरोध करत होते. लसीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नास ऊत्तर देतांना त्यांनी सांगितले की एकिकडे खाजगी हॅास्पीटल्सना ६०० रूपयांनी लस घेण्यास मोकळीक द्यायची आणि दूसरीकडे मात्र सिरमला पुन्हा त्यांच्या कडील हॅास्पीटल्सची रीक्वायरमेंट मंजूरीसाठी केंद्राकडे पाठवण्यास भाग पाडून त्यास केंद्राच्या स्वतंत्र परवानगीची अट घालावी हे दुटप्पी वागणे भाजपने बंद करावे. पुणे मनपास सिरम इन्स्टीट्यूट राज्य सरकारच्याच नियंत्रित दरात पुणेकरांसाठी लस उपलब्ध करत असल्याची बाब स्तुत्य व स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या करीता केंद्राने लवकर पुणे मनपा प्रस्तावास मान्यता द्यावी अशी मागणी देखील केली.

केंद्र सरकार आणत असलेला मदतीचा आर्विभाव तरी बंद करावा. चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजप 500 खाटांचे रुग्णालयाची घोषणा केली, प्रकाश जावडेकर यांनी देखील ११२१ व्हेंटिलेटर बाबत घोषणा केली, त्याची पुर्तता किती झाली..? ते अद्याप आलेले नाहीत. केंद्राने पाठविलेले व्हेंटीलेटर्स देखील नादुरुस्त आहेत, ते दुरुस्त करुन लवकरात लवकर उपयोगात आणू असे महापौर आश्वासन देतात, परंतु ते वास्तवात दिसत नाही.