धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेतल्याने शिवसेनेत अंतर्गत धूसफूस
राजकारण

धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेतल्याने शिवसेनेत अंतर्गत धूसफूस

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेतल्याने शिवसेनेत अंतर्गत धूसफूस असल्याचा दावा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणावरुन संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनीदेखील राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पंकजा मुंडेंच्या या मागणीला दरेकर यांनी पाठिंबा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अधिवेशनात यावरुन भाजप आक्रमक भूमिका घेणार असल्याचं एबीपी माझाशी बोलताना दरेकर यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांना वेगळा न्याय देण्यात आल्याने शिवसेनेत अंतर्गत वादळ असल्याचा दावाही त्यांनी केला. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही राज्यपालांचं अभिभाषण यासहित इतर विषयांवरही चिरफाड करणार, मात्र वीजपुरवठा खंडित करणं हा मुख्य मुद्दा असणार आहे. मोफत वीजेचं बोलता, पण देत नाही. कोरोना काळात अवाजवी बिलं आली त्यांचंही काही केलं नाही. उलट वीज खंडित करत तुम्ही त्या शेतकरी, ग्राहकाच्या जखमवेर मीठ चोळण्याचं काम केलं. नोटीस नाही, बिल तपासलं नाही. मोगलाई लागलीये का? अशी संतप्त विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली.

राठोड यांनी राजीनामा दिल्यामुळे शिवेसनेत यामुळे अस्वस्थता आहे. धनंजय मुंडेंना रक्षण देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. आपल्याही नेत्याला मंत्री म्हणून संरक्षण द्यावं अशी शिवसेनेची भूमिका होती. मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेची बाजू कमकुवत असल्याचं दिसत आहे. आपल्याला दिला तोच न्याय त्यांनाही हवा असं अंतर्गत वादळसुद्धा आहे. त्याचा परिपाक येणाऱ्या काळात दिसेल, असं प्रवीण दरेकरांनी यावेळी सांगितलं.