शिवसेनेसोबत युती करण्यासंबंधी अजित पवारांचे महत्वपूर्ण विधान
राजकारण

शिवसेनेसोबत युती करण्यासंबंधी अजित पवारांचे महत्वपूर्ण विधान

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं विधान केलं असताना शिवसेनेने नाना पटोले यांना टोला लगावताना राज्याच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र यावं लागेल असा सूचक इशारा दिला होता. अशातच शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होणार का अशी चर्चा रंगली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत जाणार की स्वबळावर असं विचारण्यात आलं असता अजित पवारांनी सांगितलं की, ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील तेव्हा कोणाकोणाची आघाडी आणि कोणाची युती हे पत्रकार परिषद घेऊन व्यवस्थित सांगतो. आता तसलं काही डोक्यात नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे, किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून जी जबाबदारी स्वीकारली आहे ती व्यवस्थित पार पाडण्याचं काम सुरु आहे. पवार यांनी यावेळी शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल व त्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलेच आहे असा सूचक इशारा शिवसेनेने सामना संपादकीयमधून दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काय समिकरणे निर्माण होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.