संजय राठोड राजीनामा देण्यास तयार, पण…
राजकारण

संजय राठोड राजीनामा देण्यास तयार, पण…

मुंबई : राज्याचे वनमंत्री संजय राठोड सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, शिवसेनेचे अन्य नेते आणि संजय राठोड यांच्यात बरच वेळ चर्चा झाली. संजय राठोड राजीनामा देण्यास तयार आहेत. ते राजीनामा घेऊन वर्षा बंगल्यावर गेले आहेत. मात्र, जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेऊ नये, अशी विनंती संजय राठोड यांनी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर एकीकडे भाजपाचा वाढता दबाव आणि दुसरीकडे शिव्सेनेते सुरु झालेली चढाओढ पाहता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. पण संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास किंवा त्यांचा राजीनामा घेतल्यास शिवसेनेवर काय परिणाम होऊ शकतात? अशा प्रश्नांवरही सध्या चर्चा सुरु आहे. दरम्यान, संजय राठोड यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा सुरु असल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र ही चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला तर विदर्भात शिवसेनेला मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे , ज्या बंजारा समाजाचं नेतृत्व संजय राठोड करत आहेत त्या बंजारा समाजाची संख्या जवळपास 2 कोटीच्या आसपास आहे. संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेला या बंजारा समाजाचा रोष पत्करावा लागेल. तर दुसरीकडे पोहरादेवी गडाच्या महंतांनीही संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये अशी भूमिका मांडली आहे.

संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेल्यास फक्त राठोड नाही तर संपूर्ण बंजारा समाज दोषी ठरला जाईल. त्यांचा राजीनामा घेतल्यानंतर राज्यात होणाऱ्या उद्रेकाला भारतीय जनता पार्टी जबाबदार राहील, अशी आक्रमक भूमिका महंत सुनील महाराज यांनी मांडली आहे. अशावेळी बंजारा समाजाची नाराजी ओढावून घेणं शिवसेनेला परवडणारं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.