आघाडीत कुठे गोडी तर कुठे धूसफूस; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश
राजकारण

आघाडीत कुठे गोडी तर कुठे धूसफूस; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

बीड – राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना अशा महाविकासआघाडीचे सरकार असले तरी कुठे गोडी तर कुठे धूसफूस असल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे संदिप क्षीरसागर यांचे समर्थक तथा बीड नगरपरिषदेचे नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांनी गेल्या दहा वर्षापासून पेठ बीड भागात सिंहासनाधिश ग्रुपच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन निर्माण केलेले आहे. समाजकारणातून आलेल्या गुंजाळ यांनी राजकारणात सक्रिय होत गत पंचवार्षिकमध्ये नगरसेवक पद भुषविले होते. सध्या त्यांच्या पत्नी नगरसेविका आहेत. बाळासाहेब गुंजाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक होते.

गुंजाळ यांनी सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्याचे काम केलेले आहे. त्यांच्या प्रवेशाने पेठ बीड भागात पुन्हा एकदा शिवसेनेचे भगवे वादळ निर्माण होणार आहे अशा शब्दात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी गुंजाळ यांचे स्वागत केले.