उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का, शिवसेनेचे आणखी दोन आमदार फुटणार?
राजकारण

उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का, शिवसेनेचे आणखी दोन आमदार फुटणार?

औरंगाबाद: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सतत पडझड सुरु असलेल्या शिवसेनेला आणखी दोन हादरे बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी लवकरच शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटतील, असा खळबळजनक दावा केला आहे. तसे घडल्यास हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मोठा धक्का असू शकतो. त्याचवेळी अगदी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले कोणते दोन शिलेदार त्यांची साथ सोडणार, याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संदीपान भुमरे यांनी शनिवारी पैठण येथील कार्यक्रमात बोलताना हा दावा केला. त्यांच्या या दाव्याने शिवसेनेच्या गोटातील चिंता वाढली आहे. भुमरे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य यांच्यावर निशाणा साधत उद्धवसेनेचे दोन आमदार फुटणार असल्याचे म्हटले. उद्धव सेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच फुटून शिंदे सेनेत येणार आहेत. एक जण येऊन आम्हाला भेटला असून दुसरा सुद्धा संपर्कात असल्याचा दावा यावेळी भुमरे यांनी केला. यावेळी भुमरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला प्रचंड गर्दी झाली होती. हाच धागा पकडत संदीपान भुमरे यांनी त्यांना लक्ष्य केले. पैठणच्या बिडकीन गावात आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या सभेपेक्षा गारुड्याच्या खेळाला जास्त गर्दी होते, अशी खोचक टिप्पणी संदीपान भुमरे यांनी केली. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून यावर काय प्रतिक्रिया येणार, हे पाहावे लागेल.

संदीपान भुमरेंची स्वत:च्याच मतदारसंघात शोभा

कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भुमरे पहिल्यांदाच शनिवारी पैठण शहरात आले होते. यावेळी त्यांच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होईल, असा अंदाज होता. त्यामुळे भुमरे समर्थकांकडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र उलट चित्र पाहायला मिळालं. कार्यक्रमाला मोजकेच जण उपास्थित होते, त्यामुळे अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या. विशेष म्हणजे सकाळी दहा वाजता कार्यक्रम सुरु होणार होता, तो संध्याकाळी चार वाजता सुरु झाला. गर्दी नसल्याने कार्यक्रम उशिरा सुरु करण्यात आल्याची जोरदार चर्चा होती.

शिवसेनेकडून संदीपान भुमरेंवर टीका

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी संदिपान भुमरे यांच्या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ ट्विट केला होता. ‘सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई अशी ‘देश भ्रमंती’ करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे आज पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात प्रगटले. त्यांच्या स्वागताला पैठण मधील काही नागरिकांसह खूप रिकाम्या खुर्च्यांची देखील उपस्थिती होती!’ अशी खोचक टिप्पणी अंबादास दानवे यांनी केली.