शेतकरी आंदोलनाचा दणका ! ‘हा’ मित्रपक्ष सोडणार भाजपाची साथ?
राजकारण

शेतकरी आंदोलनाचा दणका ! ‘हा’ मित्रपक्ष सोडणार भाजपाची साथ?

नवी दिल्ली : दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उद्या (८ डिसेंबर) होणाऱ्या भारत बंद आंदोलनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला असून, याच मुद्यावरून एनडीएतील मित्रपक्ष असलेला राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी भाजपपासून फारकत घेण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात उद्या निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मोदी सरकारने पावसाळी अधिवेशनात तीन कृषी विधेयक मंजूर करून घेतली होती. या विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं असून, या कायद्यांना शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात सरकारकडून चर्चा सुरू आहे. मात्र, अद्यापही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी उद्या (८ डिसेंबर) भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून, राजस्थानातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीनं कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे.

आरएलपीचे अध्यक्ष व खासदार हनुमान बेनीवाल यांनी माध्यमांशी बोलताना एनडीएमध्ये राहायचं की बाहेर पडायचं? याविषयी ८ डिसेंबरला निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचा शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा आहे. पंतप्रधानांनी तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत. एनडीएसोबत राहायचं की नाही, याचा निर्णय ८ डिसेंबरला घेणार आहोत, असं बेनीवाल यांनी सांगितलं.