मेट्रो निधी कपात, ड्रेनेज घोटाळा, स्मार्ट सिटीच्या प्रश्नांवर काँग्रेस आंदोलन करणार
राजकारण

मेट्रो निधी कपात, ड्रेनेज घोटाळा, स्मार्ट सिटीच्या प्रश्नांवर काँग्रेस आंदोलन करणार

पुणे : केंद्र सरकारने पुणे मेट्रोच्या निधीत केलेली कपात, स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुरू असलेला गोंधळ आणि महापालिकेच्या ड्रेनेज घोटाळ्या विरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या तीनही प्रश्नांवर आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय पुणे शहर कॉँग्रेसच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, अॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, गोपाळदादा तिवारी, रोहित टिळक, अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, आबा बागूल, नीता परदेशी, सुनील शिंदे, अमीर शेख, दत्ता बहिरट, रमेश अय्यर यांच्यासह पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे शहराच्या विकासातही महत्वपूर्ण ठरणाऱ्या पुणे मेट्रो ला मिळणार 10 टक्के निधी केंद्र सरकारने कमी केला परिणामी त्या खर्चाचा बोजा महापालिकेवर पडणार आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली विविध विकास कामांचा प्रारंभ करण्यात आला असला तरी अद्याप पुणे शहर सोडाच बाणेर – बालेवाडी भागातही एकही काम पूर्णत्वास गेलेले नाही. तसेच महापालिकेत झालेल्या ड्रेनेज घोटाळा अरविंद शिंदे यांनी उघडकीस आणला त्यावर काँग्रेस पक्ष आवाज उठवणार आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता शहरातील सर्व प्रभाग प्रभारी यांना पक्षाकडे अहवाल करण्याचे निर्देश शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिले आहेत.