शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्हं धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार? ठाकरेंना सर्वात मोठा झटका?
राजकारण

शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्हं धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार? ठाकरेंना सर्वात मोठा झटका?

मुंबई, 18 जुलै : शिवसेना पक्षातून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आतापर्यंत ठाकरेंना अनेक धक्के दिले आहेत. मात्र, आता दिलेला हा धक्का सर्वात मोठा मानला जात आहे. शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे. यावेळी शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेना खासदारांचाही वेगळा गट तयार झाल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्हं धनुष्यबाण शिंदे गटाला मिळण्याची शक्यता वाढली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेना शिंदे गटाची कार्यकारिणी

शिवसेना शिंदे गटाने शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली आहे. शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड केली आहे. तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड करण्यात आली आहे. उपनेते म्हणून यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

12 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला

त्याआधी शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावल्याचं वृत्त आहे. शिवसेनेचे एवढे खासदार शिंदे गटासोबत असतील तर ही संख्या दोन-तृतियांशपेक्षा जास्त आहे, त्यामुळे शिवसेनेला विधानसभेपाठोपाठ लोकसभेमध्येही धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे 12 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसेही नव्या गटात जाणार आहे. नव्या गटाचे प्रवक्तेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते.

शिंदे गटाला निवडणूक चिन्ह मिळणार?

अशा प्रकरणांमध्ये निवडणूक आयोग दोन्ही गटांच्या खासदार आणि आमदारांची मतमोजणी करतो. अलीकडच्या काळात, निवडणूक आयोग पक्षाचे पदाधिकारी आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी या दोघांचे म्हणणे ऐकून निर्णय घेतात. पक्ष फुटल्यास पक्षाचे किती पदाधिकारी कोणत्या गटाशी आहेत हे पाहत आहे. त्यानंतर ते निवडून आलेल्या खासदार आणि आमदारांची मोजणी करतात.

शिवसेनेचे काय प्रकरण आहे?

शिवसेनेच्या बाबतीत पक्षाचे जवळपास सर्वच पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते. त्यात खासदार-आमदार जोडले, तर उद्धव ठाकरेंचा वरचष्मा जास्त दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आतापर्यंत पक्षाचा एकही पदाधिकारी फिरकला नाही. मात्र, आता एकनाथ शिंदे यांनी कार्यकारणीच बरखास्त करुन नव्याने जाहीर केल्याने हे प्रकरण किचकट झालं आहे. इंदिरा गांधींनी पक्ष फोडला तेव्हा काँग्रेस सिंडिकेट हीच खरी काँग्रेस मानली जात होती. कारण त्यावेळी काँग्रेस पक्षाचे बहुतांश पदाधिकारी सिंडिकेटसोबत होते. मग खासदार, आमदार जोडूनही त्यांची संख्या पुरेशी होती.

निवडणूक आयोग दुसऱ्या गटाला काय म्हणतो?

अशावेळी आयोग त्यांना दुसरा पक्ष म्हणून ओळखतो आणि नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेण्यास सांगतो. दरम्यान, निवडणूक आयोग आपल्या विवेकबुद्धीनुसार दोन्ही गटांना नवीन नाव देण्यास आणि नवीन चिन्ह घेण्यास सांगू शकतो आणि जुने नाव आणि चिन्ह गोठवू शकतो.

तामिळनाडूमध्ये जेव्हा हे घडले तेव्हा आयोगाने काय केले?

1986 मध्ये तामिळनाडूमध्ये एमजी रामचंद्रन यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकचे दोन गट तयार झाले. अण्णाद्रमुक म्हणजेच AIADMK वर जयललिता आणि एमजी रामचंद्रन यांच्या विधवा जानकी रामचंद्रन यांनीही दावा केला होता. जानकी रामचंद्रन 24 दिवसांसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. पण जयललिता यांनी संघटनेच्या बहुतांश आमदार-खासदारांचा पाठिंबा तर मिळवलाच, पण पक्षातील अनेक पदाधिकारीही त्यांच्या बाजूने गेले. त्यामुळे जयललिता यांना पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळाले.