मुख्यमंत्र्यांच्या घरात नवीन वाद; बहिण काढणार वेगळा पक्ष?
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या घरात नवीन वाद; बहिण काढणार वेगळा पक्ष?

हैद्राबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांची बहिण वाय. एस. शर्मिला रेड्डी यांनी तेलंगणामध्ये नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. ‘सीएनएन न्यूज 18’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये शर्मिला यांनी हे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर आपण लवकरच राजन्ना राज्यम म्हणजेच राजशेखर रेड्डी यांची राजवट परत आणणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजशेखर रेड्डी यांची राजवट मी पुन्हा घेऊन येणार आहे. त्यांनी संयुक्त आंध्रसाठी आपला जीव दिला. तेलंगणाचे लोकं सध्या खूश नाहीत. त्यांना बदल हवा आहे, असं शर्मिला यांनी स्पष्ट केले. शर्मिला यांनी ही गोष्ट त्यांच्या वडिलांच्या विश्वासू नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सांगितली आहे. त्यांनी या नेत्यांवर तेलंगणातील वास्तविक परिस्थिती समजून घेण्याची जबाबदारी सोपवली आहे.

शर्मिला यांनी ही घोषणा करताच त्यांच्या परिवारातील दुरावा स्पष्ट झाला आहे. शर्मिला यांनी तेलंगणाच्या राजकारणात एकट्यानं प्रवेश करावा अशी त्यांचा भाऊ जगन रेड्डी यांची इच्छा नाही. शर्मिला यांनी जो राजकीय मार्ग निवडला आहे, त्याला जगन रेड्डी आणि परिवारातील अन्य सदस्यांची सहमती नाही, असे अप्रत्यक्ष संकेत जगन रेड्डी यांचे राजकीय सल्लागार आणि वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जल रामकृष्णन यांनी विजयवाडामध्ये दिले आहेत.

जगन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात वैयक्तिक मतभेद नाहीत. पण शर्मिला यांच्या राजकीय प्रवेशाबाबत मतभेद असल्याची माहिती आहे. पक्षाच्या नेत्यांनी वारंवार सूचना केल्यानंतरही जगन रेड्डी यांनी तेलंगणात पक्षाचा जनाधार वाढवण्याबाबत प्रयत्न केले नाहीत. आंध्र प्रदेशातील जनतेचीच सेवा करण्याची त्यांची इच्छा आहे. जगन रेड्डी यांनी शर्मिला यांना देखील हाच सल्ला दिला होता. मात्र शर्मिला यांचं याबाबत वेगळं मत आहे. त्यामुळे लवकरच तेलंगणाच्या राजकारणात शर्मिला नव्या पक्षासह उतरण्याची शक्यता आहे.