भाजपला शिवसेनाचा धक्का; भाजपाचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
राजकारण

भाजपला शिवसेनाचा धक्का; भाजपाचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

सांगलीत शिवसेनेने भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. भाजपच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. तर दुसरीकडे, आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी उद्धव शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना त्यांनी पूर्ण ताकद लावण्यास सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तसेच, ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला पाहिजे, त्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
दरम्यान, भाजपचे माजी सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे, सावर्डे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप माने पाटील, तासगावचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती कवठे एकंद गावचे जयवंत माळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे – पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते, आनंद पवार यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, “यापुढे होणाऱ्या ग्राम पंचायत, पालिका निवडणुकीमध्ये शिवसेना मोठ्या ताकदीने उतरणार आहे. तसेच, भाजपने शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांची बोळवण केल्यानेच नानासाहेब शिंदे, प्रदीप माने, अविनाश पाटील जयवंत माळी यांच्यासारखे कार्यकर्ते भाजपला रामराम ठोकत असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

काही दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक झाली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना मार्गगर्शन केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जोमाने काम करा, लोकोपयोगी कामं करुन जनतेचा विश्वास संपादन करा, संपर्कमंत्री आणि पालकमंत्र्यांशी समन्वय राखा आणि एकजुटीने निवडणुकांना तोंड द्या, असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसेच, सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना त्यांनी पूर्ण ताकद लावण्यास सांगितले.

दरम्यान, आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. सध्या राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणा येत असल्याचं चित्र आहे. मात्र, पुढील काही दिवसात नाताळ आणि नवीन वर्ष सेलिब्रेशन असल्यानं गर्दी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कोरोना परिस्थिती, सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आदी मुद्दे चर्चेत असताना मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागलं आहे.

या काळात राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देण्याबरोबरच राज्यातील जनतेला वारंवार आवाहनही मुख्यमंत्र्याकडून करण्यात आलं. त्याचबरोबर नवीन वर्षात सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचे संकेत महापालिका प्रशासनानं दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्री आज नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.