शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल

मुंबई : ”आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल,’ असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. देशात पाच राज्यांमध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या केंद्रशाषित प्रदेशात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाचही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीवर शरद पवारांनी भाष्य केले आहे. बारामतीमध्ये ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

”पाच राज्यातील निवडणूकांवर आज सांगणे कठीण आहे, परंतु लोक निर्णय घेत असतात पण त्या राज्यांची स्थिती मला माहित आहे त्यामध्ये माझ्या दृष्टीने केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे एकत्र आले आहेत. राज्यही त्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल यात शंका नाही.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी पश्चिम बंगाल मधील परीस्थीतीचाही आढावा घेतला. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ”पश्चिम बंगाल मध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कुणी काही म्हटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल.

तर, तामिळनाडूमध्ये आजची परिस्थिती लोकांच्या मनाचा कौल हा स्टॅलिन, डीएमके यांच्या बाजूने आहे. ते राज्याचं सूत्र हातात घेतील लोक त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच, आसाममध्ये भाजपाचे राज्य आहे. त्यांची तुलनात्मक स्थिती चांगली आहे. त्यामुळे हे एक राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल असेही पवार म्हणाले.