राहुल गांधींना मतदारसंघातच मोठा झटका; ४ नेत्यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
राजकारण

राहुल गांधींना मतदारसंघातच मोठा झटका; ४ नेत्यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना केरळमधल्या वायनाडने साथ दिली होती. वायनाडमधून राहुल गांधी मोठ्या मताधिक्याने 2019च्या लोकसभा निवडणूकीत जिंकून आले होते. आता त्याच वायनाडमध्ये राहुल गांधींना मोठा झटका बसला आहे. वायनाड जिल्ह्यातल्या ४ प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. विशेष म्हणजे या नेत्यांनी काँग्रेसविरोधी माकपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांच्याच मतदारसंघात मोठा फटका बसल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केरळमध्ये ६ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात होणाऱ्या या मतदानाची मतमोजणी मात्र थेट २ मे रोजी होणार आहे. कारण केरळसोबत पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या चार ठिकाणी देखील निवडणुका होत असून सर्वात जास्त काळ म्हणजेत ८ टप्प्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आहे. केरळ विधानसभा निवडणुकांच्या आधीच राहुल गांधींच्याच मतदारसंघात काँग्रेस नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देणं हा काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो.

काँग्रेस सोडलेल्या नेत्यांमध्ये केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव एम. एस. विश्वनाथन, महिला काँग्रेस राज्य सचिव सुजया वेणुगोपाल, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे सरचिटणीस पी. के. अनिल कुमार आणि केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे सजस्य के. के. विश्वनाथन यांचा समावेश आहे.