“शिवाजी जुन्या काळातले आदर्श; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे वादग्रस्त विधान
राजकारण

“शिवाजी जुन्या काळातले आदर्श; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे वादग्रस्त विधान

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

काय म्हणाले राज्यपाल?

आपल्या भाषणात राज्यपालांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुणाचा आदर्श ठेवावा यासंदर्भात वक्तव्य केलं. “आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

राज्यपालांच्या विधानावर संभाजीराजेंचा आक्षेप

राज्यपालांनी केलेल्या विधानावर माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केलाय. “राज्यपाल असं का बडतात मला माहीत नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, असं मी परवा सुद्धा म्हटलं होतं. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात?”, असा सवाल संभाजी छत्रपती यांनी केला आहे.