खडसे देणार भाजपला पहिला धक्का; भाजप आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर
राजकारण

खडसे देणार भाजपला पहिला धक्का; भाजप आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला पहिला झटका देणार असल्यची चर्चा सुरु झाली आहे. भुसावळचे भाजपाचे आमदार संजय सावकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधान झाले आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलणार असल्याचं बोललं जात होतं. त्याची सुरूवात आमदार संजय सावकारे यांच्या प्रवेशानं होण्याची चिन्ह आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

खरतर, संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुक्यात लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी मंत्री खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्यासह काही ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे व जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांचे फोटो दिसत आहेत. मात्र या बॅनर व शुभेच्छा जाहिरातींमध्ये भाजपची निशाणी कमळासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांचा कुठेही फोटो नसल्यामुळे आमदार सावकारे हे खडसेंसोबतच आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तसेच, सोशल मीडियावरील अनेक शुभेच्छा संदेशांवरही भाजपा नेत्यांऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे छायाचित्र होते. शुभेच्छांच्या या फलकावरून भाजपा नेते गायब असल्यानं आता सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात रंगली आहे.

जळगाव हा एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला समजला जातो. तर, भाजपा आमदार सावकारे हे एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. २०१४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी सावकारेंना राष्ट्रवादीतून भाजपात ओढलं होतं. मात्र, आता एकनाथ खडसेच राष्ट्रवादीत दाखल झाल्याने आमदार सावकारे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा केली जात आहे.