तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते?; हसन मुश्रीफांचा पडळकरांना सवाल
राजकारण

तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते?; हसन मुश्रीफांचा पडळकरांना सवाल

कोल्हापूर : ”आजच्या विरोधी पक्षनेत्यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पाच वर्षे सत्ता भोगून ते आरक्षण देऊ शकले नाहीत. तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते,” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला. ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, ”धनगर समाजासाठी आरक्षण न घेताच गोपीचंद पडळकर भाजपकडून आमदार झाले. ही कशाची बक्षिसी आहे. गोपीचंद पडळकर यांना शरद पवार यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. पातळ घालून नौटंकी करणारे आम्ही अनेकजण पाहिले आहेत, अशी बोचरी टीका मुश्रीफ यांनी केली. तसेच, पडळकर यांचा बोलवता धनी वेगळा आहे. त्याने पडळकर यांना आवरावे, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला. हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की, ”गोपीचंद पडळकर यांना अजित पवार काय आहेत, हे अजून कळलेले नाही. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अजित पवारांनी स्वत:ची ताकद दाखवून दिली आहे.

दरम्यान, अजित पवार हे दिवसाला बदलत राहणारे नेते आहेत. भाजपचं सरकार होतं तेव्हा एखादी जरी नोटीस आली तरी ते टीव्हीसमोर रडत होते. आता मात्र एखादा टग्या असल्याचा आव आणत भाषणं देत सुटले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील अजितदादांची केविलवाणी अवस्था आम्ही पाहिली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न सुरु असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले होते.

या टीकेला उत्तर देत  मुश्रीफ यांनी सरपंचपदासाठी निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर करण्याच्या निर्णयाचेही समर्थन केले. शासनाला कधीही आरक्षण काढण्याचा अधिकार आहे. कोणी न्यायालयात गेले तरी हा निर्णय टिकेल असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.