तोच उत्साह तोच जोश, गळ्यात भगवं उपरणं घालून संजय राऊत तुरुंगाबाहेर
राजकारण

तोच उत्साह तोच जोश, गळ्यात भगवं उपरणं घालून संजय राऊत तुरुंगाबाहेर

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. १०२ दिवसांनंतर पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर संजय राऊत आर्थर रोड जेलमधून बाहेर आले. यावेळी त्यांच्या गळ्यात भगवं उपरणं पाहायला मिळालं. पूर्वीच्याच जोशात संजय राऊतांनी समर्थकांना अभिवादन केलं आणि ते घराच्या दिशेने रवाना झाले. आम्ही लढणारे आहोत, लढतच राहू, अशी पहिली प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊतांनी गळ्यातील भगवं उपरणं फडकावून आणि हात जोडून अभिवादन केलं. आर्थर रोड तुरुंग परिसरात संजय राऊत यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. राऊतांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी आणि बॅनरही झळकवण्यात आले. तसंच शिवसेना पक्षाच्या मूळ गीताची धूनही वाजताना ऐकू येत होती.

संजय राऊत जेलमधून निघाले, त्यावेळी त्यांच्यासोबत बंधू सुनील राऊत होते. सुरुवातीला ते दादरमधील सिद्धिविनायक मंदिर, त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवतीर्थावरील स्मृतिस्थळ येथे भेट देतील, तिथून ते भांडुप येथील मैत्री निवासस्थानी जाणार आहेत. तिथे डीजे, फटाक्यांनी संजय राऊत यांचे स्वागत केले जाणार आहे. संजय राऊतांचे कुटुंबीय भावूक झाले असून घरात सणाचं वातावरण आहे.

दरम्यान जवळपास साडेतीन महिने तुरुंगात घालवल्याने संजय राऊत यांची प्रकृती काहीशी नाजूक असल्याची माहिती आहे. घरी गेल्यानंतर डॉक्टर त्यांची तपासणी करतील, त्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जातील

दरम्यान, १०० दिवसांनंतर पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला. पण या जामीनाविरोधात ईडीने पुन्हा हायकोर्टात अपील केलं. मात्र यावेळी मुंबई हायकोर्टाने ईडीला चांगलंच झापलं. संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे. संजय राऊतांना कोणतंही कारण नसताना अटक केली. त्यांना १०० दिवस जेलमध्ये ठेवलं. याप्रकरणी पीएमएल कोर्टात अनेक सुनावणी पार पडल्या. दोन्ही बाजूंच्या अनेक युक्तिवादानंतर पीएमएलए कोर्टाने राऊतांना जामीन मंजूर केला. त्यामुळे तुमच्या लगोलग अपील करण्याने आम्ही काही क्षणांत राऊतांचा जामीन फेटाळणार नाही, त्यामुळे दोन्ही आरोपींची अटक कायदेशीर होती हे पटवून द्या, असे सांगतानाच मुंबई हायकोर्टाने ईडीला जोरदार चपराक लगावली.